अधिकारी हतबल : विलिनीकरणाचा विरोध गोंदिया : ‘आॅल इंडिया बॅँक एम्प्लॉईज असोसिएशन’ने पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे शुक्रवारी (दि.८) बँकांत शुकशुकाट दिसून आला. या संपात केवळ लिपिकवर्गीय कर्मचारी सहभागी होते. अधिकारी ड्युटीवर असले तरी इतर कर्मचाऱ्यांअभावी ते हतबल ठरले. या संपामुळे बँकांचे कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले असतानाच दुसरीकडे ग्राहकांची मोठी गैरसोय झाल्याचेही दिसून आले. भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकाचे विलीनीकरण आणि करिअर प्रोग्रेशन स्कीमच्या विरोधात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) शुक्रवारी (दि.८) एक दिवसीय संप पुकारला होता. एआयबीईए ही देशपातळीवरील सर्वात मोठी लिपीकवर्गीय व अधिनस्त कर्मचारी संघटना असल्यामुळे या संपाचा जोरदार प्रभाव बॅँकांच्या कामकाजावर दिसून आला. या संपात लिपीकवर्गीय व अधिनस्त कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बँक अधिकारी कार्यालयात केवळ बसून असल्याचे दिसले. मात्र अन्य कर्मचारी संपात असल्यामुळे बँकांचे कामकाज ठप्प पडले होते. या संपात शासन नियंत्रित बँकेतील कर्मचारी सहभागी झाले होते. तर खासगी बँका मात्र संपात सहभागी नव्हत्या. माहितीप्रमाणे स्टेट बँकेचे कर्मचारी सेना युनियनमध्ये असल्याने येथील स्टेट बँकेचे कामकाज सुरू होते. या संपामुळे एकीकडे बँकांचे कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले व बँकांत शुकशुकाट दिसून आला. दुसरीकडे ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागल्याचेही बघावयास मिळाले.
लिपिकांच्या संपामुळे बँकांत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2016 2:12 AM