केशोरी : कोरोना विषाणूचे संकट डोक्यावर असतानाही बळीराजाने खरीप पूर्व शेतीची मशागत करुन ठेवली होती. गेल्या पंधरा दिवसापासून दररोज ढगाळ वातावरण पाहता सिंचन व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी धान पेरणी आटोपून टाकली. तर उर्वरित शेतकरी मृग पहिल्याच दिवशी बरसल्याने धान पेरणीसाठी धावपळ करुन बियाणांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
या परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागत मे महिन्यातच उरकत असतात. उन्हाळी रब्बी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बी धान पिकाची कापणी व मळणी संपताच पुढील खरिपाच्या हंगामासाठी शेती सज्ज ठेवली होती. रोहिणी नक्षत्रात एक दोनदा या भागात पाऊस येऊन गेला त्यामुळे शेतीची मशागत चांगल्या प्रकारे करता आली. पाण्यामुळे वापरलेला कचरा नाहीसा करण्यात आल्याने पुढील पिकासाठी कचऱ्याचा धोका टळला आहे. जमिनीची नांगरणी करुन धानाचे पऱ्हे फेकण्यासाठी योग्य करण्यात आली. कोरोना विषाणू संकट डोक्यावर असतानाही शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत होते. उन्हाळ्यात अवकाळी पावसाने गारपीट वाऱ्यासह कहर केल्याने शेतकरी काही प्रमाणात धास्तावला होता. रब्बी धान पीक घरी येणार एवढ्यात काही शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. तरीही नव्या दमाने व हिमतीने पुन्हा शेतकरी खरिपाच्या हंगामातील पेरणीसाठी सज्ज होऊन मृग पहिल्याच दिवशी बरसताच बरोबर बियाणांची जुळवाजुळव करुन धान पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.