काचेवानी : प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना एकरी लागवड खर्च तीन ते चार हजार रूपयांनी वाढणार आहे. मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्या बिघडल्या असून पूर्ण मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत आहेत. मागील वर्षी मे महिन्याच्या २७ तारखेला पेरण्या होण्यायोग्य पाऊस पडले. अर्धवट शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या व ६ जूनच्या सायंकाळी ७.३० दरम्यान खूप पाऊस सुरु झाला. ६ जूनला दोन तास मोकळीकता दिल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला तर २३ दिवसात तीन ते चार दिवस खंडीत पाऊस पडला व उर्वरीत पूर्ण दिवस भरपूर पाऊस पडला. मागील वर्षीचा संततधार पाऊस अविस्मरणीय राहणार आहे. त्यावेळी तीन महिन्याच्या (९० दिवस) काळात ७८ दिवस पाऊस पडले होता. तिरोडा तालुक्यात ९ वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली होती. सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पूर्वमशागत, पेरण्या, तुर आदी पिके शेतात लावण्याची वेळ पावसाने दिली नव्हती. या वर्षी रोहिणी नक्षत्र २५ मे रोजी लागताच पावसाने हजेरी लावली. तेव्हा शेतकऱ्यांनी कोणतीच पर्वा न करता पेरण्याचे कार्य झलाट्याने सुरु केले. आज काही अपवाद वगळता शंभर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.शेतकऱ्यांच्या शेतातील पेरण्यांना अंकुर आले. त्या वाढायला लागल्या आणि आता पावसाने पाठ फिरवली. चार दिवसात पडले नाही तर पेरण्या नाहिशा होणार आहेत.दोन वर्षापूर्वी शेतकरी स्वत:च्या घरचे धान्य बियाणे म्हणून वापरत असत. परंतु आता ९५ टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी संशोधित बियाण्यांची खरेदी करुन पेरण्या केलेल्या आहेत. एकरी १५०० ते हजार रुपयांचे बियाणे घेवून पेरण्या केल्या आहेत. पाऊस उशिरा आल्याने जमिनीखालच्या धानाला अंकुर आले आणि वरचे धान्य पाखरांनी उचलून खाल्ले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्या बिगडल्या आहेत. पेरण्या करण्यात आल्या त्यापैकी अधीक बिया नाकामी झालेल्या आहेत. पेरण्या बिगडल्याने आता शेतकरी दुबार पेरणी करायला लागले असल्याने एकरी दोन हजार रुपयांचा भुर्दंड त्यांच्यावर बसलेला आहे.शेतकऱ्यांना यावर्षी एकरी २१ ते २२ हजार रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी एकराला कमितकमी १६ ते १७ हजार रुपये लागत खर्च येत होता. पेरणीपूर्व मशागत, संशोधित बियाण्यांची खरेदी, पेरणी, नागरणी, रोवणी, खत, निंदाई, औषध फवारणी, कापणी, मळणी असे अनक कामे शेतकऱ्यांना करावे लागतात. एवढे काम केल्यानंतरही शेतकऱ्यांना भीतीच असते. कधी निसर्ग कोपतो तर कधी व्यापारी वर्ग धानाचा भाव घसरवून लुबाडतात. एकूण पाहता शेतकऱ्यांची स्थिती दयनिय असून शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.यावर्षी मजुरांच्या रोजीत भरपूर वाढ झाली आहे. मग्रारारोहयो कामावर भरपूर रोजी दिल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली आहे. आजच्या परिस्थितीत मजूर वर्ग शेतात काम करायला तयार नाहीत. वाढती महागाई, वस्तुंच्या वाढलेल्या किमती, घसरते धानाचे भाव यामुळे शेतकरी कंटाळून गेलेला आहे. आजची शेती मुद्दाम परवडण्यासाखी राहिली नाही. त्यामुळे जमीन मालक शेती करायला नाकारत असून अधिया (बटई), ठेक्याने द्यायला तयार आहेत. जमीन उगावी म्हणून मोफत जमीन लावायला द्यायला तयार आहेत. मात्र जमिनीत स्वत: धान्य लावायला तयार होताना दिसून येत नाही. यावर्षी शेतकऱ्यांना शेतात धानाचे उत्पादन समाधानकारक होणार, असे चिन्ह मुद्दाम दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तरी निसर्ग साथ देणार, असे दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या गंभीर संकटाला लक्षात घेवून गावस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तराच्या महसूल विभगाने सतर्कता ठेवून शेतकऱ्यांच्या हितार्थ संरक्षणात्मक योजना आखण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पाऊस लांबल्याने पीक लागवड खर्चात होणार वाढ
By admin | Published: July 01, 2014 11:32 PM