आमगाव : चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध येथे शाळेत शिकणारे विद्यार्थी जिव धोक्यात घालून पुरातून जातात किंवा नाल्यास जास्त पुराने वेढले तर शाळेत जात नाही. त्यामुळे मुलांच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आमगाव येथे अनेकदा लेखी तक्रार करून विभागाचे डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चिचटोला गावावरून झालीया, पिपरटोला पुढे धानोलीकडे जाणारे मोठ्या प्रमाणात आहे. याच मार्गानी शालेय विद्यार्थी झालीया, कावराबांध येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. कुवाढास नाल्या जवळ बाघनदी वाहत आहे. नदीला पाणी सोडले की उलट पाणी नाल्यात येतो. नाल्यावर छोटा पाईप टाकून नाला आहे. मात्र नाल्यावर ४ ते ५ फूट पाणी असतो. एवढ्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेण्याकरिता जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की नाला तुडूंब भरून जातो. तेव्हा विद्यार्थी शाळेत जात नाही. सतत दोन महिने या नाल्यावर पाणी वाहत आहे. या मार्गावर विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव शासकीय कामे, बाजार, बँक इत्यादी कामाकरिता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असतो. मात्र मागील दोन महिन्यापासून ग्रामस्थांना मोठी कसरत करून पुरातून जावे लागते. काही दिवसापूर्वी पिपरटोला येथील एका मुलीचे निधन आजारपणामुळे झाले. नाल्यास पूर नसता तर तिला प्राथमिक उपचारासाठी आमगाव येथे नेता आले असते. नाल्यास पुर ही नेहमीचीच बाब झाल्याने गावात व परिसरातील झोला छाप डॉक्टराची चांदी आहे. उपचार करून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल रुग्णांकडून करतात अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सदर कुवाढास नाल्याची उंची वाढविण्यासंदर्भात किंवा नविन पूल तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाण्यातून पुलावरून जातांना मोठी विपरीत घटना होण्यास क्षणाचा विलंब लागणार नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आमगाव येथे वर्षाकाठी दोन ते तिन वेळा लेखी मागणी करण्यात तात्पुरते पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. मात्र उपविभागीय अभियंता शरद क्षत्रिय व शाखा अभियंता ढोमणे यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी वेळ नाही. केवळ डोळेझाक करून वेळकाढूपणाचे धोरण येथील अधिकाऱ्यांचे सुरू आहे. पिपरटोला सरपंच अमरलाल लिल्हारे, सरपंच सावंगी सुमिद्र उपराडे, उपसरपंच गीता भेदे, चैतराम देशकर, पुष्पा नागपुरे यांनी या मार्गावरील पुलावर व बाजूला पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
कुवाढास नाल्याच्या पुरामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात
By admin | Published: August 27, 2014 11:41 PM