आमगाव : महाराष्ट्रात मान्सूनने चांगली धडक दिली असली तरीही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणात अत्यल्प उपयुक्त जलसाठा असून पावसाअभावी धरणे भरली नाही तर जलसंकटाचा सामना करण्याची स्थिती उद्भवू शकते.
गोंदिया जिल्हा अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाअभावी जिल्ह्यातील धरण तहानलेलेच आहेत. निम्मा पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे आजची स्थिती पाहता जिल्हयात पाणी टंचाई अटळ आहे. जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था ही धरणाच्या पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दमदार पाऊस अजून कोसळलेलाच नाही. निम्मा पावसाळा लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सर्वात मोठ्या ईटियाडोह धरणात आजच्या घडीला केवळ ३०.९५ टक्के ( ९८.३८ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सिरपूर धरणात १५.९१ टक्के ( २५.४२ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, पुजारीटोला धरणात ६२ टक्के (२६.९९ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा, कालीसराड धरणात ८.९३ टक्के (२.३३ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. सध्या शेतात पेरणी करण्यापुरता पाऊस झालेला असला, तरी नद्यानाल्यांना पाणी येण्यासाठी पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना व जिल्हावासीयांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.