गोंदिया : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट, न्या. मुकुलिका जवळकर व न्या. नितीन बोरकर यांच्यामुळे नागपूर व गोंदिया जिल्ह्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपुरात जडणघडण झालेल्या या पाचही अतिरिक्त न्यायमूर्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यांचा शपथविधी हा १ जून रोजी मुंबई येथे होणार आहे.
न्या. नितीन बोरकर हे मूळचे गोंदिया सिव्हिल लाईन माता मंदिर वॉर्ड येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण नागपूर येथून पूर्ण झाले. त्यांचे वडील रुद्रसेन बोरकर हेसुद्धा प्रसिद्ध वकील आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्थेचे धडे त्यांना घरातूनच मिळाले. न्या. बोरकर यांनी आधी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, तर पुढे चालून नागपूरमध्ये अॅड. आर. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. न्यायिक अधिकारी झाल्यानंतर त्यांनी विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्य केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते चंद्रपूरमध्ये प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. विशेष म्हणजे न्या. बोरकर यांचे दोन भाऊसुद्धा वकील आहेत. सचिन बोरकर हे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात वकील आहेत, तर विवेक बोरकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील आहेत. एक भाऊ शैलेश बोरकर हा इंजिनिअर आहे, तर बहीण मीना बोरकर-मेश्राम ही डाॅक्टर आहे. न्यामूर्ती नितीन बोरकर हे सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार होते. त्यांनी सुरुवातीपासूनच न्यायमूर्ती होण्याचे ध्येय बाळगत त्या दृष्टीने परिश्रम घेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी न्यायिक कार्य केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच त्यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. ही समस्त जिल्हावासीयांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.