प्रवेशबंदी करा : नागरिकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. परिणामी अपघातांच्या प्रमाणात वाढ तर होते. शिवाय रस्त्याचीही पुरती वाट लागत आहे.ट्रक, कंटनेर, ट्रॅक्टर ही मालवाहू वाहने आहेत. या वाहनांत किती टन माल वाहून न्यायचे याचे प्रमाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यलयाने ठरवून दिले आहेत. महामार्गावर जडवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांत प्रमाणापेक्षा जास्तच माल भरलेला असतो. अतिजड वाहने चालवितांना चालकांचे कधी नियंत्रण सुटणार याचा नेम नाही.शिवाय ही वाहने चालविणारे चालक आपली दिशा सोडत नसतात. समोरुन येणाऱ्या वाहन चालकालाच आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न्यावे लागते. परिणामी अपघात घडतात. रस्ते कितीही मजबूत तयार केले असले तरी ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागणे निश्चितच असते. ओव्हरलोड वाहने रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत असली तरी रस्त्यावरील खड्यांचा इतर वाहनांनाच अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या मार्गाने गाडी चालवत असतानाही अनेकदा वाहन अपघात घडत असतात. ओव्हरलोड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तर ही ओव्हरलोड वाहतूक थांबू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार बिनधास्त सुरू आहे. परिणामी ओव्हरलोड वाहनांची ये-जा मोकाट सुरू असून शहरातील रस्त्यांचे मात्र हाल झाले आहेत. रस्ते उखडून मोठाले खड्डे पडले. याच रस्त्यांवरून आता वाहतूक करावी लागत असून वाहनचालकांची चांगलीच फसगत होत आहे. कित्येकदा खराब रस्त्यांमुळे अपघातही घडत आहेत. हा प्रकार गांभीर्याने घेत ओव्हरलोड वाहनांसाठी विशेष मोहीम राबवून यावर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे. तेव्हाच रस्त्यांचे हाल व अपघात होणार नाहीत.
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट
By admin | Published: June 13, 2017 1:00 AM