शासन मंजूर करणार रेशन व केरोसीन परवाने
गोंदिया : ग्रामीण भागात रेशन दुकाने व केरोसीनचे परवाने देण्यासाठी संबंधित गावातील ग्रामसभेचा ठराव आवश्यक होता. मात्र, आता ग्रामसभांच्या ठरावाशिवाय शासन परवाने मंजूर करणार आहे.
शेंडा पुतळी मार्गे देवरी बससेवा सुरू करा
शेंडा (कोयलारी) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता एसटी महामंडळाने मागील २२ मार्चपासून साकोली आगाराची सडक-अर्जुनी, शेंडा, पुतळी मार्गे देवरीला जाणारी बससेवा पूर्णत: बंद केली आहे. परंतु आता अनलॉक ५ प्रक्रिया सुरु झाल्याने मुख्य मार्गावरील बस सेवा सुरु झाली आहे. मात्र या मार्गावरील बस सेवा सुरु झाली नाही.
महिला परिचर मानधनापासून वंचित
आमगाव : जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आमगाव व गोरेगाव तालुक्यातील अंशकालीन स्त्री परिचरांना मागील आठ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
तिरोडा : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने सांडपाणी व कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाही.
वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष
सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनतस्करांनी वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याची संधी साधून जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचेही जीव धोक्यात आले आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन वृक्षतोडी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त
आमगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा
तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
खड्ड्यामुळे अपघातांची शक्यता
सालेकसा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यामध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते धोकादायकच आहेत.
दोन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा
सडक-अर्जुनी : डोंगरगाव खजरी येथील राजकुमार मानकर यांचे घर गेल्या दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पडल्याने ते बेघर झाले आहेत. राहण्यासाठी घर नसल्यामुळे त्यांना घरकुलाची प्रतीक्षा आहे.