सालेकसा : उन्हाळ्याला सुरूवात होण्याआधीच यंदा फेब्रुवारीच्या सुरूवातीला तालुक्यातील छोटे तलाव आटले असून मोठे व मध्यम तलावसुध्दा आटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बोरवेलसुध्दा आटू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यंदा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून पाण्यासाठी हाह:कार माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सालेकसा तालुक्यात जवळपास प्रत्येक गावालगत छोटे-मोठे तलाव, गावबोडीची व्यवस्था आहे. या बोडीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधीच्या अनेक समस्या सुटत असतात. तलावाखालील शेतीत सिंचनाची सोय, जनावरांना पिण्यासाठी पाणी, जनावरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घर बांधण्यासाठी तसेच इतर अनेक कामासाठी गावकरी लोक तलावाच्या पाण्याचा उपयोग करतात. जंगलू पशु -पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी या तलावामध्येच उपलब्ध असते. तलावात उपलब्ध पाण्याच्या आधारावरच परिसरातील जंगलात वन्यजीव पशू-पक्षी भ्रमण करीत असतात. जर पाण्याची सोय नसेल तर वन्यजीव इतर परिसराकडे गमन करतात. परंतु परिसरात पाणी नसेल तर वन्यजीव अनेक वेळा मानवी वस्त्यांकडेही धाव घेतात. याचा मोठा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. यंदा कदाचित अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या काही भाग ओलीत क्षेत्राखाली असून त्या क्षेत्रात सिरपूरबांध, पुजारीटोला धरण आणि कालीसराड धरणाचे पाणी कालव्याद्वारे जाते. परंतु कालीसराड, पुजारीटोला धरणात नाममात्र पाणी उरले आहे. तर सिरपूरबांधमध्ये सुध्दा अतिरीक्त जलसाठा नसल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी देण्यात आले नाही. रबी पिकासाठी पाणी दिल्यास अनेक गावात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होते. परंतु यंदा उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळत नसून दुहेरी समस्या निर्माण होत आहे. तालुक्यातून वाहणारे नदी-नाले सुध्दा कोरडे झाले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचे स्त्रोतसुध्दा संपले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता यंदा तालुक्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
भीषण पाणीटंचाईकडे वाटचाल
By admin | Published: February 16, 2016 3:24 AM