गोंदिया : शहरातील भाजीबाजार परिसरातील बर्तन लाईनमधील एका भाड्यांच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.२३) रात्री ९.२० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान अग्नीशमन विभागाचे कर्मचारी वेळीच दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामुळे मोठी वित्त व जीवीत हाणीे टळली. बर्तन लाईनमध्ये नंदलाल अग्रवाल यांचे भाड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास अग्रवाल यांच्या दुकानातून धूर निघताना या परिसरातील काही लोकांना दिसला. त्यांनी लगेच याची माहिती शहर पोलिसांना व अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळातच अग्नीशमन विभागाचे कर्मचारी अग्नीशमन गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचे मालक अग्रवाल हे सुध्दा काहीच वेळात पोहचले त्यांनी दुकानाचे शर्टर उघडले त्यानंतर अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. दरम्यान ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शार्ट सर्कीटमुळे भांड्याच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:17 AM