गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दीड महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या नजरा एसटी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मागे घेतला जातो, याकडे लागल्या आहेत.
मागील दीड महिन्यापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. विशेषतः खासगी प्रवासी वाहनधारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.
खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चांगलाच जिव्हारी लागत आहे. शहरात खरेदी करण्यासाठी किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असताना एसटीच्या संपाने सर्वसामान्यांचा प्रवासच बंद केला आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला असला तरी ते परवडणारे नाही.
सर्वसामान्यांना भुर्दंड
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती अथवा वृद्धांना वैद्यकीय कामानिमित्त गोरेगाव, गोंदिया या शहराकडे जाण्यासाठी साधनच उपलब्ध नाही. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे कर्मचारी तर दुसरीकडे राज्य शासन दोन्ही आपल्या अटीवर अडून आहेत. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, त्यांची होरपळ होत आहे.
एसटीच्या संपाचा प्रभाव हा शैक्षणिक क्षेत्रावरही पडत आहे. तेव्हा शासन किंवा एसटी कर्मचारी यांनी एक पाऊल मागेपुढे करत यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.
- विलास कावळे, सामाजिक कार्यकर्ता
दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमी गोंदियाला ये-जा करावी लागते; मात्र एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचा किंवा दुचाकीचा आसरा घ्यावा लागतो. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट बिघडत आहे.
- विशाल बागडे