गोंदिया : महिन्यांतील सुरुवातीचे चार दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने आता दडी मारली आहे. ऐन वेळी पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनीला भेगा पडल्या असून जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या माथी चिंतेच्या रेघोट्या दिसत असून त्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे मात्र तुटीतील फरक दिवसेंदिवस वाढत चालला असून, सोमवारी (दि.१४) हा फरक सरासरी ३८२ मिमीवर पोहोचला होता.
यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने आणखी तीन महिने पावसाचे आहेत हा विचार करून शेतकरी समाधानी होता. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने साथ दिली. मात्र, पाहिजे तेवढा पाऊस जुलै महिन्यातही बरसला नाही. अशात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरसला नसल्याने तूट पडली. ती तूट कायम असून ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने ही तूट काही प्रमाणात कमी झाली व शुक्रवारी (दि.४) सरासरी ७८ मिमीवर आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून पावसाने दडी मारली असून, मधामधात फक्त सरी बरसल्या आहेत.
नियमित पाऊस बरसत नसल्यामुळे मात्र जिल्ह्यातील पावसाची ही तूट दररोज वाढत चालली असून सोमवारी (दि.१४) ही तूट सरासरी ३८२ मिमीवर पोहोचली होती. विशेष म्हणजे, रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली त्यातही फक्त काही वेळच पावसाच्या सरी बरसल्या. एवढ्या पावसाने काहीच फरक पडणार नसून जिल्ह्याला आता नितांत गरज आहे ती दमदार पावसाची. असे न झाल्यास ही तूट आणखी वाढत जाणार व अशातच पावसाळा निघून जाण्याची भीती आहे. यामुळेच शेतकरीच नव्हे तर अवघे जिल्हावासीय ‘देवा, आता तरी अंत पाहू नको, अशी आर्त हाक आकाशाकडे बघून देत आहे.
मागील वर्षी होता पूर, यंदा मात्र ठणठणाटच
मागील १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात झडीचा पाऊस बरसत होता व त्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती होती. संततधार पावसामुळे पावसा-पावसातच स्वातंत्र दिन साजरा करावा लागला होता. यंदा मात्र जिल्ह्यात विपरीत परिस्थिती दिसत आहे. यंदा पाऊस नसून पाण्याची नितांत गरज आहे.
कोरडा दुष्काळ जाहीर कराऑगस्ट महिना अर्धा लोटला असला तरीही पावसाचा ताळमेल काही जमता जमत नसल्याची स्थिती आहे. पाऊस नसल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पिके वाळू लागली आहेत. अशीच स्थिती राहिली तर खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. आता फक्त सप्टेंबर महिना उरला असून तोवर मात्र पिके हातची गेली असणार आहे. अशात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सोमवारी फक्त १.५ मिमी सरासरी पाऊस
५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, फक्त पावसाच्या हलक्या सरीच बरसल्या आहेत. हाच प्रकार रविवारी (दि.१३) सायंकाळी घडला. सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सोमवारच्या आकडेवारीनुसार फक्त १.५ मिमी सरासरी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. या पावसाची काहीच मोजदाद नसून त्याचा काहीच उपयोग नाही. उलट सोमवारी त्यामुळे उकाड्यात वाढ झाली.
अशी वाढत आहे पावसाची तूट (सरासरी)४ ऑगस्ट- ७८ मिमी
७ ऑगस्ट- १०९ मिमी८ ऑगस्ट- १३८ मिमी
९ ऑगस्ट - १७६ मिमी११ ऑगस्ट- ३३५ मिमी
१४ ऑगस्ट - ३८२ मिमीसोमवारी बरसलेला पाऊस (मिमी)गोंदिया- ३.६
आमगाव-०५तिरोडा- ४.३
गोरेगाव- ०.९सालेकसा- ०.०
देवरी- ०.१अर्जुनी-मोरगाव- ०.२
सडक-अर्जुनी- ०.६
- आतापर्यंत बरसलेला पाऊस- ६९५.३ मिमी सरासरी- मागील वर्षी बरसलेला पाऊस- १०७७ मिमी सरासरी