महामानवाची जयंती थाटात : जिल्हाभरात रॅली आणि कार्यक्रमांमधून बाबासाहेबांना वाहिली आदरांजलीगोंदिया : कसा शोभला असता भीम नोटावर... या गाण्यावर बेधूंद होऊन नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने शहर गजबजून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरात निघणाऱ्या भव्य रॅलीची शहरातील एक परंपराच आहे. महामानवाला जन्मदिनाची शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शहरात निघणाऱ्या या रॅलीत मोठ्या संख्येत लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला व पुरूष सहभागी होतात. शहरातील प्रत्येक परिसरातील आंबेडकरी बांधव आपापली वेगळी रॅली काढत असतात. तर सर्व रॅली एकत्र आल्याने एक भव्य रॅली तयार होत असून गोंदियाकरांना आकर्षून घेते. शहरातील मुख्य मार्गाने निघत असलेल्या या रॅलीत ठोल-ताशे व डिजेवर धुंद होत नाचत गात आंबेडकरी बांधव बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. त्यानुसार यंदाही शहरात भव्य रॅली निघाली व आंबेडकरी बांधवांनी एकच जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला. कसा शोभला असता भीम नोटावर.... यासह भिम के लख्ते जीर.... सारख्या गाण्यांवर नाचत तरूणाईने बाबासाहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा अर्पण केल्या. सर्व रॅलींचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. गोंदिया शहरासोबत तिरोडा, अर्जुनी मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी अशा अनेक ठिकाणी बँडबाजासह व डिजेसह रॅली काढून आंबेडकरी जनतेने आनंद व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)
‘जय भीम’च्या गजरात दुमदुमला जिल्हा
By admin | Published: April 15, 2016 2:22 AM