लालसिंह चंदेल ।आॅनलाईन लोकमतपांढरी : अद्याप कडक उन्हाळ्याला सुरूवात झालेली नाही. मात्र पाणी टंचाईची ओरड सुरु झाली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील डुंडा येथील महिलांना फेब्रुवारी महिन्यातच सकाळपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात काय स्थिती राहील याची कल्पना न केलेली बरी असेच चित्र या परिसरात आहे.ग्राम डुंडा येथे ग्रा. पं. कार्यालयाच्या माध्यमातून आठ बोअरवेल व दोन शासकीय विहिरी आहेत. एक नळ योजना असे पाण्याचे स्त्रोत आहेत. खाजगी विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्याने गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात नळ योजना असून विद्युत बिल थकीत असल्याने व पाण्याचे मोटार पंप जळाल्यामुळे मागील वर्षभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. पंचायत विभागाने ग्रा.पं.कार्यालयाला अर्धे पाण्याचे बिल भरण्याची सवलत दिली. मात्र यानंतरही नळ योजना बंद असल्याची माहिती आहे. परिणामी गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. तर गावकरी सायकल व बैलबंडीचा आधार घेत दूरवरुन पाणी आणत असल्याचे चित्र आहे. भूजल पातळी खोल गेल्याने बोअरवेलला देखील पाणी येत नाही. त्यामुळे महिलांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. डुंडा येथील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. ग्रामपंचायतच्या सामान्य फंडामध्ये दोन ते तीन लाख रुपये जमा असल्याची माहिती आहे. त्याचा उपयोग मागील सरपंचानी व विद्यमान सरपंचानी केलेला नाही. त्यामुळे हा निधी खर्चाविना परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी गावातील बंद असलेली नळ योजना सुरू करण्याची मागणी आहे.पाणी पुरवठा समितीमध्ये दोन ते तीन लाख रुपये जमा असून समितीमार्फत ठराव घेऊन व नळ योजनेची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरू करता येते.-शरद चिमनकरसचिव, ग्रा.पं.कार्यालय डुंडा
डुंडा येथील महिलांची पाण्यासाठी भटंकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:25 AM
अद्याप कडक उन्हाळ्याला सुरूवात झालेली नाही. मात्र पाणी टंचाईची ओरड सुरु झाली आहे.
ठळक मुद्देगावातील विहिरी पडल्या कोरड्या : बोअरवेलने गाठला तळ