न्यायालयाचे आदेश : पक्षी पकडणे पडले महागातसडक अर्जुनी : नवेगावबांध राखीव अभयारण्य परिसरातील कनेरी बिटमध्ये शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी रंगेहात मिळून आलेल्या पक्षी पकडणाऱ्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.१८) वनकोठडी सुनावली आहे. किसन तुळशीराम ताराम (५०, रा.कोसमघाट) हा पक्षी पडकण्यासाठी पिंजऱ्याचा (फास) वापर करून कनेरी बिट क्रमांक १७१ मध्ये शुक्रवारी (दि.१५) पक्षी पकडत होता. यासाठी त्याने नाल्यापासून झुडपापर्यंत धान टाकून फास झुडपात अर्धा गाडलेला व खुंटीला बांधून ठेवला होता. त्याला सायंकाळी वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. शनिवारी (दि.१६) त्याला येथील दिवानी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विकास साठे यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत सोमवारपर्यंत (दि.१८) वन कोठडी सुनावली आहे. किसन तारामकडे मिळून आलेल्या फासाद्वारे तो मोर सारख्या पक्ष्यासह लहान प्राणीही पकडत असल्याचे वन परिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांनी सांगीतले. तर हा फास लोखंडी काम करणाऱ्या फिरस्त्यांकडून घेतल्याचे ताराम याने सांगीतले. वन्यजीव विभागाचे आर.एस. दोनोडे यांच्या माहितीच्या आधारावर वन परिक्षेत्राधिकारी राठोड, क्षेत्र सहायक सुनील खांडेकर, वनरक्षक आर.आर. काळबांधे, ए.बी. बडगे, वनमजूर शामराव खरवडे, महादेव शिवणकर, नाजूक मानकर यांनी ही कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
पक्षी पकडणाऱ्यास वनकोठडी
By admin | Published: January 18, 2016 2:06 AM