संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : महाराष्ट्राची संताची भूमी म्हणून ओळख आहे. बाराव्या शतकाच्या आरंभापासूनच महाराष्ट्रात सांस्कृतिक प्रबोधनाची लाट आली होती. विविध संप्रदायांनी आपल्या धार्मिक कार्यामुळे समाज जीवनावर मोठा पगडा पाडला होता.अनेक संप्रदायातील संतमंडळी सर्वच जाती धर्मातील होती. समाजात असलेल्या कुप्रथा व अंधकार नष्ट करण्याचे महत कार्य संतानीच आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून केले आहे. मात्र वर्तमान युग हे आधुनिक व गतीमान आहे. या युगात समाजावर पश्चिमात्य संस्कृतींचा पगडा असल्याने देशाची संस्कृती लोप पावत आहे. मराठी संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जनता जनार्धनाला सद्विचाराकडे नेण्यासाठी आज खरी गरज आहे. मात्र हे करत असताना यात राजकारण व्हायला नको. यात नेमके तेच घडत आहे हे आमचे दुदैव म्हणावे लागेल.विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या दुर्गम, आदिवासी अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन दिवसीय मराठी संत साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. हे नेमके संत साहित्य संमेलन होते की राजकीय संमेलन होते हेच कळायला मार्ग नाही. या संमेलनात मुख्यमंत्री, सात मंत्री व सहा आमदारांची केवळ तीन दिवसात हजेरी हा चर्चेचा मुद्दा आहे. राज्यात शेतकºयांची अवस्था फार बिकट आहे. गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. पण हल्ली येथील बहुतांशी तलाव, बोड्या आटलेल्या आहेत. यंदाचे बरेच ऋतू कोरडे गेले. उमेदीच्या काळात रोगराईने पिकांचे झाले. या विवंचनेतून बाहेर निघत नाही तोच नुकत्याच झालेल्या गारपिटीने तोंडातला घास हिरावून घेतला. आज अनेक तालुके दुष्काळाने होरपळत आहेत. शासनाने कर्जमाफी दिली. त्याचा मोठा गाजावाजा केला जातोय. पण अद्यापही जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांच्या खात्यात पैसे पोहोचले नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केली. याचा निश्चितच अर्थकारण व व्यवस्थेशी संबंध येतो. दुसरीकडे शेतकरी संकटात असताना सरकार अशा संमेलनांवर वारेमाप उधळण करतो. यावरुन शासनाला शेतकºयांचे जगणेही मान्य नाही व मरणेही मान्य नाही. याचीच प्रचिती येते. शेतकºयांच्या आत्महत्या म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. दुष्काळ हा दरवर्षीचाच. त्यावरुन होणारे मदतीचे राजकारणही नित्याचेच. समाजातील अनेक घटकांसाठी धोरणं, आयोगं येतात जातात. नुकतेच शासनाने कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली. मात्र शेतकºयांच्या वाट्याला केवळ अश्रूच येतात. कोणतेही धोरणं, आयोगं येवून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होईल असे घडल्याचे ऐकिवात नाही आणि चुकून आलेही तर शासनाला त्याच्या शिफारसी मान्य नाहीत. या साºया दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. संमेलनाला कुणाचीच अडचण नाही. अडचण आहे, झालेल्या उधळपट्टीची.तीन दिवसात एवढे मंत्री आले की अर्जुनीवासीयांसाठी ‘न भूतो’ अशी बाब आहे. पण या मंत्र्यांच्या मांदियाळीने आम्हाला काय दिले हा प्रश्न आहे. मग एखाद्या मंत्र्यावरही हे निभावले असते. लोकांनी संताचे विचार ऐकायचे की मंत्र्यांचे?एखाद्या गावात एखादा मंत्री येतो त्याच्या सुरक्षेपासून तर आवभगत पर्यंत किती खर्च येतो हे सांगण्यासाठी अर्थपंडिताची गरज नाही. संमेलन हे मराठी संतांचे होते. राजकारण्यांचे नव्हे. मात्र हा मंच तर संतांचा वाटतच नव्हता. किंबहूना आयोजक हे राजकीयांच्या दावणीलाच बांधले असल्याचे जाणवले. संतही अगतिक अल्याचे दिसून आले. या संमेलनाला मंत्र्यांची कृपा असे भाषणातून बोलत होते. मूळात हा बार्टीचे आयोजन नव्हतेच पार्टीचे होते. शासकीय खर्चाने पक्षाचा कार्यक्रम? याची प्रचिती एका नेत्याचे पक्षचिन्ह व फोटो असलेल्या कॅलेंडरच्या वाटपावरुन येते.या भूमिला झाडीपट्टी रंगभूमीचा वारसा आहे. झाडीपट्टी ही कलावंतांची खाण आहे. झाडीपट्टीतील मराठी माणूस हा अस्सल कलाप्रेमी. झाडीपट्टीतली नाटकं हे कित्येक पिढ्यांचे मनोरंजनाचे साधन राहिले आहे. आणि ते मराठी मनाच्या प्रबोधनाचे एक सशक्त अस्त्र. याच तालुक्यातील झाडीपट्टीच्या बहिणाबाई चौधरी म्हणून ओळखणाऱ्या कवयित्री अंजनाबाई खुणे आहेत. यांनी अनेक वर्षे या प्रबोधनातच घालवली. अशा सत्कार्याचा सत्कार व्हायला पाहिजे. मात्र चित्र काही वेगळेच आहे. आयोजकांना कलेची कदर नाही. अंजनाबाईचा ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्कार केला आणि झाडीपट्टीच्या कलावंतांचा त्यांना विसर पडला. याविरुद्ध एक, दोन नव्हे तर पाचशे पेक्षाही अधिक भाजपधार्जीण्य कार्यकर्त्यांचा या मंचावर सत्कार झाला. सत्कारात थंडी गेल्यानंतर शाल पांघरण्यात आली. याचा मात्र कार्यकर्त्यांच्या चेहºयावर ओसंडून आनंद वाहत होता.जेवढे मोठे संमेलन होते, तेवढेच ढिसाळ नियोजन होते. कार्यक्रम गावात झाले पण गावातील व्यापारी, सामाजिक संघटनांना विश्वासात घेण्यात आले नाही. गावात साध्या पत्रिकाही वाटल्या नाहीत. गावात कोणताही मोठा माणूस आला की, नगराध्यक्षाला तेवढाच माना असतो. या आयोजनात एका पत्रिकेवर त्यांचे नावच नाही. ही बाब निदर्शनास आली तेव्हा कुठे त्यांचा नाव असलेल्या दुसºया पत्रिका काढण्यात आल्या. एका पत्रिकेत माजी खा. नाना पटोलेंचे नाव आहे दुसºया पत्रिकेत नाही. कार्यक्रमाची नेमकी कोणती पत्रिका खरी? याचे उत्तरही आयोजकांजवळ नाही. हे सातवे साहित्या संमेलन होते. यापूर्वी झालेली सहा मराठी संत साहित्य संमेलने बार्टीने घेतली की आणखी कुणी? हा सुद्धा चर्चेचा विषय होता.
जिल्हा दुष्काळात, सरकार संमेलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:47 PM