रामदास बोरकर
नवेगावबांध (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत १८ गावांना नळ योजनेच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. पण पाणी पुरवठा योजनेचे १० लाख ९८ हजार रुपयांचे वीज बिल थकले आहे. हे वीज बिल भरण्यासाठी महावितरणने नोटीस बजावली असून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या १८ गावातील गावकऱ्यांवर भर उन्हाळ्यात दूषित पाणी पिण्याचे संकट ओढविण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून प्रती व्यक्ती ५५ लीटर प्रति व्यक्ती पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही बंद पडण्याचा मार्गावर आहे. या योजनेंतर्गत गोठणगाव तलाव येथील पाणी मोटारपंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्वच्छ करून अर्जुनी मोरगाव नगरपंचायत व गोठणगाव, सुरबन, बोंडगाव सूर, कराडली, गंधारी, प्रतापगड, रामनगर अर्जुनी मोर, मोरगाव, निलज, माहूरकुडा, मालकनपूर, ताडगाव, झरपडा, बुदेवाडा, बोळदे आदी १८ गावांना मागील १२ वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा केला जातो. पण शासनाच्या नवीन धोरणामुळे ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
१० लाख ९८ हजार रुपयांची वीज बिल थकले
पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी पूर्वी राज्य सरकारकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० टक्के अनुदान दिले जात होते. त्यामुळे योजना चालविण्यासाठी येणारा खर्च व होणारी वसुली यामधील तूट भरून निघत होती. परंतु मागील तीन वर्षांपासून राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान देणे बंद केले. परिणामी जिल्हा परिषदेला विद्युत बिल भरणे अशक्य झाले आहे. १० लाख ९८ हजार रुपयांचे विज बिल थकीत आहे. परिणामी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिली आहे. परिणामी गावकऱ्यांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
योजना जि.प.कडे हस्तांतरित
ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित असून सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीद्वारा संचालित खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाद्वारे चालविण्यात येत आहे. जि.प. सह झालेल्या करारानुसार देखभाल दुरुस्ती व विद्युत बिलाचे खर्च हे जिल्हा परिषद नियमित आजपर्यंत भरत आली. मागील मार्च महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे विद्युत बिल भरायला पैसे नसल्यामुळे १० लाख ९८ हजार रुपयांचे बिल थकीत झाले आहे.
अर्जुनी नगर पंचायतकडे ३० लाख रुपये थकीत
प्रती नळ कनेक्शनला पाणी देण्याकरिता संस्थेला एका महिन्याला ३४० रुपये खर्च येतो. त्यापैकी १२० रुपये नळ कनेक्शन धारकांकडून वसूल केल्या जातात. तर उर्वरित निधी जि.प. देत होती त्यामुळे या योजना आजपर्यंत सुरळीत चालविल्या जात होती. कनेक्शनधारकांकडून शंभर टक्के वसुली होते कुठलीही थकीत बाकी राहत नाही. केवळ नगरपंचायत अर्जुनी मोरगाव यांच्यावर ३० लाख रुपये थकीत असल्याची माहिती आहे.