ठिबक सिंचन योजना : ३२.८२ लाख रुपये अनुदानाची रक्कम वाटपदेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात धानपीक वगळता इतर शेती करण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचे प्रस्ताव व मंजूर प्रकरणांनुसार दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षांत ठिबक सिंचन योजनेचा केवळ १०९ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे कृषी विभागाने दिलेल्या संख्येवरून दिसून येते. ठिबक सिंचन म्हणजे रोपांच्या मुळांवर विशिष्ट पद्धतीने थेंबथेंब पाणी देणे. तर तुषार सिंचन (स्प्रिंग कलर) म्हणजे रोपांच्या वरून विशिष्ट पद्धतीने फव्वारा पद्धतीने पाणी देणे, अशी सुटसुटीत व्याख्या केली जाऊ शकते. विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत यात सन २०१३-१४ मध्ये केवळ ५२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी त्यांना ६५.१४ लाख रूपयांचे अनुदानही देण्यात आले. तर सन २०१४-१५ मध्ये १५२ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यांना अनुदानापोटी २०.१३ लाख रूपये देण्यात आले. तर सन २०१५-१६ मधील २५१ लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर केले होते.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला. त्यांना ३२ लाख ८२ हजार रूपयांचे अनुदानही थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यात गोंदिया तालुक्यातील ३४ शेतकरी, तिरोडा तालुक्यातील ११, गोरेगाव तालुक्यातील १६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११, देवरी तालुक्यातील ७, आमगाव तालुक्यातील ४ व सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ शेतकरी असे एकूण १०९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ठिबक सिंचन योजनेचा लाभ सर्वाधिक सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतल्याचे सदर आकडेवारीवरून दिसून येते. मात्र तुषार सिंचन योजनेचे लाभार्थी जिल्ह्यात शून्य आहेत. तुषार सिंचन योजनेसाठी अर्जुनी-मोरगाव येथील केवळ एका शेतकऱ्याने प्रस्ताव सादर केला होता, मात्र नंतर त्याने त्यासाठी नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.अनुदानाबाबत माहितीविदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आॅनलाईन प्रस्ताव सादर करावा लागतो. पूर्वी १.४० हेक्टर क्षेत्रावरील १२ बाय १२ मीटर अंतरावर पीक लागवडीस बसविलेल्या ठिबक सिंचनाचा खर्च २३ हजार २६३ रूपये येत होता व त्यावर ५० टक्के अनुदान म्हणजे ११ हजार ६३१ रूपयांचा लाभ लाभधारकास दिला जात होता. आता ठिबक योजनेसाठी हेक्टरी ३७ हजार व तुषार योजनेसाठी हेक्टरी ९ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात. यात अल्पभूधारकांना ५५ टक्के तर सर्वसाधारण लाभार्थ्यास ४५ टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो. योजनेच्या लाभासाठी अशी आहे प्रक्रियामागील चार वर्षांपासून सदर योजना सुरू आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व ८ अ असावा. शेतात विहीर किंवा बोअरवेल असावी. जे पीक घ्यायचे आहे त्याची नोंद सातबारावर असावी किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याने मौका तपासणी अंती पीक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. विद्युत पंपाची जोडणी असावी. सिंचन क्षेत्र ०.२० हेक्टरपेक्षा कमी नसावे. तसेच लाभार्थ्याने यापूर्वी विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अत्यल्प म्हणजे ज्याची शेती एक हेक्टरपर्यंत व अल्प म्हणजे एक ते दोन हेक्टरपर्यंत शेती, असा अर्थ आहे. सुरूवातीला आॅनलाईन प्रस्ताव सादर करावा लागतो. स्वत:च्या खर्चाने नोंदणीकृत डिलरकडून संच बसविला जातो. यानंतर कृषी विभागाचे अधिकारी मौका चौकशी करून प्रस्तावास मान्यता देतात व अनुदानाची कार्यवाही केली जाते.
वर्षभरात १०९ शेतकऱ्यांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:58 AM