गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियानात गटप्रेरिका म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना मागील वर्षभरापासून अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनाची समस्या त्वरित मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांनी गटप्रेरिकांना लवकरच मानधन देण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण विकास मंत्रालयातंर्गत येणाऱ्या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. ही सर्व कार्य उमेद अभियानातील गट प्रेरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे. मात्र या गटप्रेरिकांना मागील वर्षभरापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच बऱ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह याच मानधनावर अवलंबून असल्याची बाब आ.विनोद अग्रवाल यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत प्रकल्प संचालक राजाराम दिघे व सहायक प्रकल्प संचालक मानसी बोरकर यांना १५ दिवसाच्या आत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता उमेद अभियानातील गटप्रेरिकांचा थकीत मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.