गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रवासी विमान वाहतूक सेवेच्या टेकऑफचा मार्ग सुकर झाला आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच सुखद बाब आहे.
बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी उड्डाण उपक्रमांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात दिल्ली येथील फ्लाय बिग कंपनीने या विमानतळावरून विमान सेवा करण्यास अनुकूलता दर्शविली. त्यामुळे पहिला टप्प्यात बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदोर-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ या मार्गावर एकच विमान सेवा देणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यात वाढ केली जाणार असल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना न मिळाल्याने अडचण आली होती. पावसाळी अधिवेशनात खा. सुनील मेंढे यांनी गोंदिया येथील बिरसी विमानतळाच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले होते. विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा आणि मालवाहतूक म्हणजेच कार्गो सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने लवकर अडचणी दूर करण्यात याव्यार, अशी मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटूनही ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. मुख्यत्वे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या परवानगीसाठी प्रवासी वाहतुकीचा विषय रेंगाळत होता. तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर परवाना मिळाल्याने मार्ग सुकर झाला आहे.
............
उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य सिंधिया
बिरसी विमानतळावरून या महिन्याच्या अखेरीस प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवेच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया येणार आहेत. त्यांच्यासह इतरही मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
..........
कार्गो सेवेसाठी प्रयत्न सुरू
बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातून तांदूळ, तसेच भाजीपाला आणि फळांचीसुद्धा निर्यात करणे शक्य आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून असल्याने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरू शकते त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.