गोंदिया : गोंदिया हे पूर्व विदर्भातील प्रमुख शहर असूनही, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांपर्यंत राष्ट्रीय महामार्गाला जोडले गेले नव्हते. गोंदिया शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खा. सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी ५२१ कोटी २४ लाख रुपयांचा निधी केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने मंजूर करून यातील निधीचा मार्ग सुकर केला आहे.
गोंदिया-तिरोडा तसेच गोंदिया-आमगाव या रस्त्याने वाहतूक करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गोंदियासह आजूबाजूच्या परिसराचा विकास रखडला होता. खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दोन्ही महामार्गाच्या विस्तारिकरणासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. बालाघाट टी पॉइंट जंक्शन, गोंदिया येथून सुरू होणाऱ्या चारपदरी गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ साठी २८२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गोंदिया शहरातील ४.१० किमी लांबीच्या चारपदरी रस्त्याचा व तिरोडा शहरातील २.६९ किमी अंतराच्या चारपदरी रस्त्याचा (एकूण ६.७९ किमी) समावेश आहे. पतंगा मैदान चौक गोंदिया येथून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ (गोंदिया-आमगाव) साठी २३९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये किडंगीपार क्रॉसिंग आमगाव येथील चारपदरी उड्डाण पुलाचा समावेश आहे. तसेच खमारी, ठाणा व गोरठा या गावांना जोडणाऱ्या २.९५ किमी लांबीच्या चारपदरी रस्त्याचा समावेश आहे. ज्यामध्ये १ मोठा व लहान २२ पुलांचा समावेश आहे.
......
गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर
मनसर-तिरोडा रस्त्याचे काम सुरू आहे व तिरोडा-गोंदिया व गोंदिया-आमगाव रस्त्याचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. यातील एक महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ला, तर दुसरा मनसरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला जोडला जाणार आहे. यामुळे पहिल्यांदाच गोंदिया, तिरोडा आणि आमगाव राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले आहे. गोंदिया शहरातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्रीय मार्ग विकास मंत्रालयाने निधी मंजूर करून जिल्हावासीयांची मागणी मान्य केली आहे.