मुंडीकोटा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन शासनाने दीड वर्षापासून संपूर्ण शाळा बंद ठेवल्या आहेत. या महामारीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण साधनाअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण परिसरातील प्राथमिक शाळा नियमित पूर्ण उपस्थितीने सुरु कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. परंतु ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या तसेच गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, शोषीत वंचित घटकातीलच नव्हे तर मध्यमवर्गीय कुटूंबातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकले नाही ही वास्तविकता आहे. त्यामुळे मागील दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णत: टळलेला आहे. २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि शिक्षकही पाहिलेले नाहीत. शाळा बंद पण शिक्षकांची सेवा सुरुच विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेत येत असतात. दरम्यानच्या काळात शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत अनेक शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्याने शिक्षकांनी कोरोना सबंधाने सोपविण्यात आलेली सर्व कामे सातत्याने केलेली आहेत. अजूनही अनेक शिक्षक कर्तव्यावर आहेत. यावेळी कोरोना स्थिती बरीच कमी झाली आहे. शासनाने शिथीलता दिली असून व्यवहारी सुरळीत व्हायला लागले आहेत. बाजारपेठ उघडल्या आहेत. त्यामुळे निकषाच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीच्या सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागात होत आहे.