गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. एम. अभ्यंकर यांनी दिले.
अल्पसंख्याक संस्थांचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर चर्चा, निराकरण व उपाययोजनेबाबत गुरुवारी (दि. १२) शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप समरीत, नागपूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक सतीश मेंढे उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, अल्पसंख्याक समाज जास्तीत-जास्त शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण विभागाने अविरत प्रयत्न करावे. अल्पसंख्याक कमिशनतर्फे शाळेच्या संस्थांचे, समस्यांचे निराकरण अवश्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. एम. अभ्यंकर यांनी गोंदिया येथील विवेक मंदिर शाळेमध्ये भेट देऊन अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. भावेश चौधरी, वीरेंद्र बिसेन व रोशन करंजेकर यांनी तयार केलेले प्रोजेक्ट टेम्परेचर अँड ह्युमिडिटी, अल्ट्रासोनिक रेंज फिंडर, स्मार्ट डस्टबीन, थ्रीडी प्रिंटर सिस्टीम, वॉटर
क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम, वे मेझरमेंट, कार्बनडाय ऑक्साईड मॉनिटरिंग सिस्टीम प्रोजेक्टचे निरीक्षण करून संशोधनात्मक वृत्तीचे कौतुक केले. यावेळी विवेक मंदिर शाळेचे संस्थाचालक दिलीप जैन, पालीवाल, चव्हाण, दीपम पटेल, प्राचार्य नीता कारवट, अशोक कारटा व अप्पर तहसीलदार अनिल खडतकर उपस्थित होते.