गोंदिया : क्षेत्रातील जनतेने केलेल्या विश्वासावर खरा उतरण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. यामुळे शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळावा व नेहमी जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी जनतेच्या पाठीशी उभा राहून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या डेमो हाउसच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागात १२६६६२ लाभार्थ्यांनी आवेदन केले होते. त्यात ९२८७१ अर्जदारांना पात्र आणि ४६९२७ अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामधून ४४१२१ पात्र लाभार्थी वंचित राहिले व ४८४६ लाभार्थ्यांना आधीच मंजुरी मिळाली होती. तरीपण जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. वेळेवर पाठपुरावा केल्यामुळे राज्यात सर्वांत जास्त गोंदिया जिल्ह्यासाठी ४१०८९ प्रपत्र (ब) यादीतील घरकुल मंजूर करून आणले. त्यात गोंदिया तालुक्यातील १३००० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. एवढेच नव्हे, तर घरकुल बांधकामासाठी वाळूचा प्रश्नही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खंडविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समितीमधील सर्व अधिकारी- कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.