सालेकसा : गोवारीटोला येथील शेतकरी जगतलाल तिजुलाल लिल्हारे यांनी आपल्या शेतात लावलेल्या पंपासाठी वीज जोडणी घेतली. मात्र त्यांनी एका महिन्यात केवळ २६ युनिट विजेचा वापर केला असताना विजेचे देयक तब्बल आठ हजार १२४ रुपयांचे मिळाले. याची चौकशी केल्यावर मीटरमध्ये २६ युनिट दाखवत असताना प्रत्यक्षात बिलात ३३०० युनिट वापरल्याचे नमूद केल्याचे दिसून आले. महावितरणच्या या प्रतापाने सदर शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे.विद्युत विभागाने जगतलालच्या नावाने ८ हजाराच्या वरच्या देयकाची रक्कम देयकात नमूद केली. २६ युनिट वीज वापर केल्याचे सांगितले, परंतु विद्युत कार्यालयातून त्यांना तीन वेळा त्यांना परत पाठविण्यात आले. त्यांची कैफियत ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हते.शेवटी सदर शेतकऱ्याने विद्युत मीटर मधील वापरलेल्या युनिटचे छायाचित्र काढले आणि सोबत काही लोकांना विद्युत कार्यालयात नेऊन युनिटचे आकडे दाखविले. तेव्हा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने त्यांची कैफियत ऐकून घेतली. विद्युत विभागाचे लोक वीज ग्राहकांशी उध्दटपणे का वागतात? ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यात संयमतेचा परिचय का देत नाही? असे प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अवघ्या २६ युनिटसाठी आठ हजारांचे बिल
By admin | Published: October 08, 2015 1:24 AM