एकोडी : मागील २ आठवड्यांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने एकोडीवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. विशेष म्हणजे, पाइपलाइनमधील लिकेज दुरुस्त करण्यात न आल्याने हा प्रकार घडत आहे. मात्र सचिव ओ. एन. तूरकर व प्रशासक कटरे यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
सविस्तर असे की, एकोडी येथे ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील दोन आठवड्यांपासून गावातील पाणीपुरवठा बंद पडून आले. येथील बसस्थानकाजवळून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी लिकेज झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. हे लिकेज दुरुस्त करण्यासाठी मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र लिकेज दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला मुहूर्त मिळत नसल्याने आता दोन आठवडे होत असूनही खड्डा आहे तसाच आहे. दुसरीकडे लिकेजची दुरुस्ती मात्रा झाली नाही.
उलट या खड्ड्यामुळे अडचण निर्माण झाली असून, अपघातांचा धोका बळावला आहे. सचिवाचे लक्ष नाही तर प्रशासकाची बरोबर देखरेख नाही व या दोघांच्या हलगर्जीपणा व वेळ मारून नेण्याच्या प्रवृत्तीमुळे फसगत होत असल्याचे गावकरी बोलत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासक कटरे यांच्याशी संपर्क केला असता या कामाकरिता माझ्याकडून कोणतीही अडसर नसल्याचे त्यांनी सांगितले, तर सचिव तूरकर यांच्याशी दूध्वनीवरून संपर्क केला असता काम लवकर होईल, असे सांगितले. या दोघांमध्ये कुठलेही तारतम्य नसून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत.