अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडणुकीचे वारे जोराने वाहण्यास सुरूवात झाली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्याच्या अखेरीस वाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात केली आहे. ही निवडणूक जरी खासदाराची असली तरी या निवडणुकीनंतर तीन चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या आमदारांना त्यांच्या क्षेत्रातून उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.या निवडणुकीतील विजयाच्या गणितावरुन आमदारांचे प्रगती पत्रक ठरणार आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारासह आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जरी खासदाराची असली तरी खरी परीक्षा मात्र आमदारांची होणार आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून मार्च अखेर केव्हाही जाहीर होवू शकतो. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष मतदार संघात सक्रीय झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, महाआरोग्य शिबिर, महिला मेळावे यामाध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मतदारांशी जवळीक साधून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे समीकरण नाना पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिल्याने पुन्हा बदलले. सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व पीरिपाने च्या उमेदवाराने पुन्हा या मतदार संघावर आपले वर्चस्व स्थापन केले. या पोटनिवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार असलेल्या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले होते.अर्जुनी मोरगाव, तिरोडा, तुमसर, साकोली, भंडारा या मतदार संघात भाजपाचे दमदार आमदार आहेत. मात्र यानंतरही त्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळवून देण्यात यश आले नाही. मात्र ही पोटनिवडणूक असल्याने याला पक्ष श्रेष्ठींनी फारसे गांर्भियाने घेतले नाही. पण आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या आमदारांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीकरीता आमदार सुध्दा तयारीला लागले असून मागील दोन तीन महिन्यांपासून मतदार संघात कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे.या निवडणुकीनंतर प्रत्येक आमदाराच्या मतदार संघातून संबंधित पक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांच्या गोळा बेरजेवरुन आमदारांचे रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहे. याच रिपोर्टकार्डवरुन तिकिट वाटपाचे सूत्र बऱ्याच प्रमाणात अवलंबून असणार असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच ही निवडणूक खासदारांची असलीे तरी परीक्षा मात्र आमदारांची असणार आहे.सहापैकी पाच मतदार संघ भाजपकडेभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहे. यापैकी तुमसर, साकोली, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा हे मतदार संघ भाजपाच्या ताब्यात आहेत. तर गोंदिया विधान मतदार संघ काँग्रेसकडे आहे. भाजपासाठी ही जरी जमेची बाजू असली तरी पोटनिवडणुकीत बदलेल्या समीकरणाने बरेच चित्र बदलले आहे. त्यामुळेच या पाचही मतदार संघातील आमदारांना लोकसभेच्या निवडणुकीत चांगले रिझल्ट द्यावे लागणार आहे.उमेदवार कोणभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून सर्व पक्षांनी उमेदवार कोण असणार याची अद्यापही घोषणा केलेली नाही. तर युती आणि आघाडीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मात्र हा मतदार संघ सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या पक्षाकडून खा.प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल यांची नाव चर्चेत आहेत. तर भाजपाकडून आ. परिणय फुके, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांची नावे चर्चेत आहे. या निवडणुकीत या दोन पक्षांसह इतरही पक्ष निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असणार यावरुन मतदार संघात चर्चा सुरू आहे.
निवडणूक खासदाराची परीक्षा मात्र आमदारांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:53 AM
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडणुकीचे वारे जोराने वाहण्यास सुरूवात झाली. लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्याच्या अखेरीस वाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात केली आहे.
ठळक मुद्देवारे निवडणुकीचे : निकालावरुन ठरणार प्रगती पत्रक, कार्यक्रमातून चाचपणीला सुरूवात