आमगाव : जून व जुलै महिन्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या. अनेक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावून सत्ता स्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यात कुणाला यश तर काहींना अपयश पत्करावे लागले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते २ आॅगस्ट रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदांच्या निवडणुकीकडे. यातील उमेदवारांमध्ये निवडून येण्याकरिता पैज लागली आहे. त्याचप्रकारे जे मतदान करणारे मतदार आहेत त्यांची मांदियाळी लागली असून उमेदवारांकडून त्यांची चांगलीच चांदी होत आहे.सन १९६१ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मात्र जवळपास तीन वर्षे प्रशासकीय कारवाईमुळे सभापती किंवा निवडणुका झाल्या नाही. त्यावेळी बाजार समितीचे प्रारूप छोटे होते. सन १९६४ मध्ये निवडणुका झाल्यानंतर पहिले सभापती मदनलाल शर्मा झाले. त्यानंतर ५४ वर्षाच्या कालखंडात तीन वर्षे वगळता ५१ वर्षांत १० सभापती वेगवेगळ्या पार्टीचे खुर्चीवर विराजमान झाले. सहा वेळा प्रशासकांनी बाजार समिती चालविली.येणाऱ्या निवडणुकीबाबत संपूर्ण उमेदवारांचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातून आपले उमेदवार दिले, तर काँग्रेस-भाजप युती झाल्याने नगरातील अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. एकंदरीत सत्तेची भागीदारी ही नगरातच राहिली पाहिजे, असा कदाचित दिग्गजांचा मानस असला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यापारी गटातून जे उमेदवार सत्तेसाठी हालचल करीत आहेत, त्यात मतदारांसमोर मोठी द्विधा मन:स्थिती दिसत आहे. सर्वच आपले, मग निवडून कुणाला द्यायचे, हा प्रश्न मतदारांसमोर घर करून उभा आहे. तात्पर्य या निवडणुकीत कोण जिंकणार व कोण हारणार, हे येणाऱ्या ३ आॅगस्टला समजेल. तसेच नगरातील सट्टा बहाद्दरांनासुद्धा भाव लावता येत नाही, असे चित्र समोर आहे. (तालुका प्रतिनिधी)
निवडून येण्यासाठी उमेदवारांमध्ये पैज
By admin | Published: August 01, 2015 2:11 AM