लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्य प्रदेशातून रोजगारासाठी तिरोडा तालुक्याच्या बघोली येथे येवून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या रीता प्रभूदयाल भगत यांनी आपल्या साई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान थाटली. दुकानात पतीसह मेहनत करून संसाराचा गाडा हाकत समाजात प्रतिष्ठा सुद्धा मिळवून दिली.गटात येण्यापूर्वी रीता गृहिणी म्हणून काम करायच्या. त्या मध्यप्रदेशातील राहणाऱ्या असून कुटुंबाची परिस्थिती योग्य नसल्यामुळे व पतीला काम नसल्यामुळे त्या बघोली येथे येवून राहू लागल्या. तेथे त्यांचे पती एका इलेक्ट्रीकल दुकानात तीन हजार रूपये महिन्याने कामावर लागले. सात वर्षांपासून भाड्याच्या घरातच संसार सुरू होता. मुले लहान असल्याने त्या कुठे कामावरही जावू शकत नव्हत्या. पतीच्या ३ हजार रूपयांच्या मिळकतीतच कुटुंबाचा प्रपंच करीत होत्या.एक दिवस सहयोगिनी व सीआरपी गावात आल्या व १० ते १२ महिलांना गोळा केल्या. त्यात रीताचाही समावेश होता. त्यात सहयोगिनी यांनी महिलांना गटाची संकल्पना सांगितली. सर्व महिलांनी घरी पतीला विचारून सांगू, उद्या या, असे सांगितले. मात्र रीताने याच बैठकीत गटात नाव टाकण्याचा निर्णय घेतला. पण एकता पतीला विचारून घ्यावे, असा विचार मनात आल्याने त्यांनी पतीला बचत गटाची माहिती दिली. पतीने परवानगी दिली.दुसºया दिवसी सीआरपी व सहयोगिनी मोहल्ल्यात आल्या व १८ जुलै २०१४ रोजी साई बचत गटाची स्थापना करण्यात आली. गटात एकूण १२ सदस्य आहेत. सर्व महिलांनी रीता यांनी सचिव म्हणून निवड केली. त्यांनीसुद्धा सचिव पदाची जबाबदारी हसतमुखाने स्वीकारली. दर महिन्याच्या २ तारखेला गटाची बैठक घेणे, रेकार्ड भरणे व पंचसूत्रीनुसार गट चालविण्याची जबाबदारी त्या पार पाडू लागल्या. एकदा त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यांना पैशाची गरज पडली. त्यांनी गटाची बैठक घेवून एक हजार रूपयांचा अंतर्गत कर्ज घेतला. तो पैसा मुलाच्या औषधोपचारावर खर्च केला.गटाच्या बैठकीत सहयोगिनी यांनी विविध प्रशिक्षण दिले. एका बैठकीत बँक कर्ज घेवून व्यवसाय करण्याबाबत माहिती सांगण्यात आली. ती माहिती रीता यांनी पतीला सांगितली. पतीपत्नी दोघांनी घरीच छोटीशी दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गटाच्या बैठकीत बँक कर्जाविषयी चर्चा केली. गटातील सर्व महिलांनी मंजुरी दिली. त्यामुळे त्यांनी एकटीनेच १२ मे २०१५ रोजी आयसीआयसीआय बँकेचे ३८ हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान सुरू केली.त्यांचा व्यवसाय चांगला चालायला लागला. या व्यवसायाच्या नफ्यातून त्या आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाची किस्त २५०० रूपये नियमित भरू लागल्या. पण व्यवसायासाठी भाड्याचे घर लहान पडू लागले. त्यामुळे दोघा पती-पत्नीने विचार करून गावाकडील शेती विकून इकडे जागा घेवून घर बांधण्याचा निर्णय घेतला. दीड एकर शेती सहा लाख रूपयांत विकून इकडे जागा घेतली व स्वत:चे घर बांधले.त्यांचे आयसीआयसीआय बँकेचे कर्जसुद्धा संपत आले होते. त्यामुळे दोघांनी परत विचार करून पुन्हा कर्ज घेवून दुकान वाढविण्याचे ठरविले. रीता यांनी गटाची बैठक घेवून चर्चा केली व पुन्हा त्यांना कर्ज घेण्यासाठी सर्व महिलांनी मंजुरी दिली. त्यामुळे त्यांनी ८ जून २०१६ रोजी आयसीआयसीआय बँकेचे पुन्हा एक लाख रूपयांचे कर्ज घेतले व दुकान मोठी केली. तसेच दुकानात सामान भरण्यासाठी गटातून अनेकदा अंतर्गत कर्जही घेतले. त्यांनी गटातून आतापर्यंत ८६०० रूपयांचे अंतर्गत कर्ज घेतलेला आहे. तर त्यांची बचत २४५० रूपये जमा झाली आहे. त्यांनी पतीला स्वत:चा व्यवसाय सुरू करून दिल्यामुळे पतीला दुसºयांच्या दुकानात काम करावे लागत नाही. आज त्यांचे कुटुंब सुखी व आनंदी आहे. त्यामुळे त्यांनी बचत गटातील सर्व महिला, सीआरपी, सहयोगिनी, प्रेरणा ग्रामसंस्था, माविम व जीवनोन्नती अभियानाचे आभार मानले.
अल्पशिक्षित असूनही देत आहेत अनुभवातून प्रशिक्षणआज रीता यांची गटाच्या सचिव व प्रेरणा ग्रामसंस्थेच्या कोषाध्यक्ष अशी ओळख निर्माण झाली आहे. समाजात मानही मिळत आहे. आता त्या दुसऱ्या गटातील बुककिपर महिलांना रेकार्ड लिहिण्याचे प्रशिक्षण देतात. रीता जरी अल्पशिक्षित असल्या तरी त्या स्वत:चे रेकार्ड स्वत: लिहितात. सहयोगिनी व सीआरपी यांच्या सहकार्याने गटाच्या माध्यमातून त्या खूप काही शिकल्या. त्या अनुभवाचा फायदा आज दुसऱ्या गटातील महिलांना मिळत आहे.
पतीच्या व्यवसायात मदत व मुलांचे शिक्षणरीता आपल्या पतीसह दुकानात वार्इंडिंचे काम करून पतीला व्यवसायात मदत करतात. हे काम त्या पती व सहयोगिनी यांच्या प्रेरणेमुळे शिकल्या. पतीपत्नी दोघेही सदर व्यवसाय सुरळीत चालवित आहेत. या व्यवसायातून त्या आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाची पाच हजार रूपयांची किस्त भरतात. तसेच मुलांचे शिक्षण व घरातील खर्च याच व्यवसायातून सांभाळत आहेत.