वजन काट्यांनीच होते मोजणीगोंदिया : धान मोजणीत काटा मारून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी पणन महामंडळाच्या आदेशावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी केली. मात्र मागील वर्षी काटे खरेदी केल्यानंतरही त्यांना बगल देत आजही साधारण काट्यांवरच बाजार समितीत मोजणीचा प्रकार सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत व्यापाऱ्यांकडून टोलवाटोलवीचे कारण सांगीतले जात आहे. यात मात्र प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून बाजार समितीलाच इलेक्ट्रॉनिक काट्यांची ‘अॅलर्जी’ असल्याचे दिसते. उन्ह पावसात घाम गाळून पिक काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा. तसेच धानाच्या मोजणीत काटा मारून त्यांची लूट होऊ नये याची खबरदारी घेत असलेल्या पणन महामंडळाने इलेक्ट्रीक काट्याने धानाची मोजणी करण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. महामंडळाच्या या आदेशाचे पालन करीत येथील बाजार समितीने २५ इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी केले आहे. मागील डिसेंबर महिन्यात हे २५ इलेक्ट्रॉनिक वजन काटे सुमारे २.७५ लाख रूपयांत खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.आता हे काटे खरेदी करून वर्ष लोटले ी४३आहे. मात्र खरेदी करण्यात आलेले हे काटे आजही बाजार समितीतील एका खोलीत कुलूपबंद पडून असावेत. पणन महामंडळाच्या आदेशावरून या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी करून बाजार समिती प्रशासनाने किती कर्तव्यदक्षतेने समितीचा कारभार सुरू आहे हे दाखवून दिले. मात्र काटे खरेदी केल्यानंतर त्यांचा वापर करण्यात प्रशासन फेल ठरत आहे. हेच कारण आहे की, वर्ष लोटूनही या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना बगल देत साधारण काट्यांवरच बाजार समितीतील मोजणीचा कारभार सुरू आहे. आज सर्वत्र नवनवीन यंत्राचा वापर केला जात आहे. जुन्या यंत्रांचा वापर सोडून नवीन तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. दुसरीकडे मात्र बाजार समितीत जुन्या यंत्रांचाच वापर होत असून नवीन तंत्रज्ञानाला बगल दिली जात असल्याने हा प्रकार संशयास्पद दिसून येतो. एकीकडे बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना पत्र देऊन इलेक्ट्रॉनिक काट्यांनी मोजणी करण्याबाबत सूचविण्यात आले असल्याचे सांगीतले जात आहे. कधी मात्र हमाल ट्रेंड नसल्याने व्यापारी याचा विरोध करीत असल्याचे तर कधी समितीचे स्थानांतरण होणार असल्याने काटे काढले नसल्याचे कारण बाजार समिती प्रशासनाकडून सांगीतले जात आहे. येथे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची सक्ती केली जाऊ शकते. मात्र असे होत नसल्याने बाजार समिती प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद दिसते. (शहर प्रतिनिधी)
इलेक्ट्रॉनिक काट्यांची ‘अॅलर्जी’
By admin | Published: April 08, 2016 1:32 AM