प्रकाश वलथरे - केशोरी : अवकाळी पावसाने मागील आठवड्यात सलग चार दिवस हजेरी लावून धानपिकांचे मातेरे करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत असताना शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात एन्ट्री करीत शेतातील धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अवकाळीनंतर आता शेतकऱ्यांवर हत्तींच्या कळपाचे संकट उभे ठाकले आहे.
पश्चिम बंगालमधून दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी एन्ट्री करीत मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह, राजोली भरनोली, रामपुरी, बाक्टी व नवेगावबांध या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर हा हत्तींचा कळप नागणडोहमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परत गेला होता. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून पुंजणे शेतात रचून ठेवले आहे.
मागील आठवड्यात सलग अवकाळी पाऊस झाल्याने मळणीची कामे थांबली होती. तर दोन तीन दिवसांपासून वातावरणाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या मळणीची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली.
यामुळे या शेतकऱ्यावर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, भरनोली येथील शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच भरनोली येथे पोहोचत नुकसानीचे पंचनामे केले. तसेच हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी पथक पाठविले.
कळपाचा भरनोली परिसरातच मुक्कामगडचिरोली जिल्ह्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात आहे. या कळपात २५ च्या वर हत्ती असल्याची माहिती आहे. या कळपाचा याच परिसरात मुक्काम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर अवकाळी पावसानंतर आता हत्तींच्या कळपापासून धानाच्या पुंजण्याचे संवर्धन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गावकऱ्यांना सजग राहण्याचा इशाराहत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली असून भरनोली परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे.
वन विभागाचे कर्मचारी हत्तींच्या कळपावर नजर ठेवून -रानटी हत्तींचे कळप जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या कळपाच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत.