गोंदिया : हत्तीच्या कळपाचा दिवसा राष्ट्रीय उद्यानाच्या परिघात तर रात्री मिळेल त्या वाटेने प्रवास सुरू असतो. शेतातून मार्गक्रमण केल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. सध्या हत्तीच्या कळपाचा संचार रामपुरी भागात असून येथे शेतपिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.हत्तीच्या कळपाचे तालुक्यातील मलकाझरी परिसरात २६ एप्रिल रोजी पुनरागमन झाले. हा परिसर राष्ट्रीय उद्यानात येतो. तेव्हापासून हा कळप त्याच परिघात मार्गक्रमण करत आहे. सध्या तो रामपुरी परिसरात दाखल झाला आहे. रात्री वाट मिळेल तसा प्रवास होतो. त्यामुळे शेतपीक पायदळी तुडविल्याने नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्री रामपुरी येथील राजकुमार हरिचंद सलामे, जेनलाल परसराम वाढई व सुदाम बाला सलामे यांच्या शेतात नुकसान केल्याची माहिती आहे. त्यानंतर हा कळप पुन्हा राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातच येऊन स्थिरावला आहे.
वनविभागाचे कर्मचारी या कळपावर देखरेख ठेवून आहेत. गावागावात जनजागृती केली जात असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. हत्तीचा कळप बिथरून जीवित अथवा इतर हानी करेल, असे कृत्य करू नये. फटाके फोडू नये. कळपाला त्रास देऊ नये. रस्त्यावर वाहनांच्या हॉर्नचा जोरात आवाज करू नये. चित्रीकरण करू नये. कळपाची छेड काढू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत. - सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी राष्ट्रीय उद्यान नवेगाव