लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत गावात दारु बंदीसाठी एल्गार पुकारला. त्यानंतर गावात दारुबंदीसाठी मतदान घेवून उभी बाटली आडवी केली. याचेच चांगले पडसाद आता गोंदिया तालुक्यातील अदासी-तांडा येथे उमटले. या गावातील महिलांनी गावात दारुबंदीसाठी भव्य रॅली काढून महिला व गावकऱ्यांमध्ये जनजागृती करुन गावात दारुबंदीचा संकल्प केला.अदासी-तांडा येथे सोमवारी (दि.३) दारुबंदी समितीच्या वतीने दारुबंदीसाठी रॅली काढण्यात आली. यात गावातील महिला मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. गावातील मुख्य मार्गावरुन रॅली काढून त्यानंतर अदासी येथे सभा घेण्यात आली. या वेळी तांड्याचे सरपंच मुनेश रहांगडाले, माजी जि.प.सभापती जगदीश बहेकार, अदासीचे सरपंच रवी पंधरे, चेतनसिंह परिहार, संजय टेंभुर्णीकर, अशोक गौतम, पुष्पाताई कटरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दारुच्या व्यसनामुळे कुटुंब कसे उध्वस्त होत आहेत, याची माहिती दिली.दारुमुळे गावातील वातावरण सुध्दा कलुषीत होत असून युवा पिढीवर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे गावात दारुबंदी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. उपस्थित महिलांनी यावेळी गावात दारुबंदी करण्यासाठी तंटामुक्त समितीचेही सहकार्य राहणार आहे. संचालन दुधबरय्या यांनी केले तर आभार कुरेशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी नारायण भगत, पुनमचंद चव्हाण, खेमन फुंडे, महेश मेश्राम व तांडा-अदासी, गोंडीटोला येथील दारुबंदी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
अदासी ताडांवासीयांचा दारुबंदीसाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:00 AM
गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत गावात दारु बंदीसाठी एल्गार पुकारला. त्यानंतर गावात दारुबंदीसाठी मतदान घेवून उभी बाटली आडवी केली. याचेच चांगले पडसाद आता गोंदिया तालुक्यातील अदासी-तांडा येथे उमटले.
ठळक मुद्देरॅली व सभेतून केली महिलांनी जनजागृती : अनेकांनी दिली साथ