साखरीटोला : खरीप हंगाम अर्धा संपला तरी बँकेकडून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासारख्या व इतर समस्या घेऊन बहुजन समाज पार्टीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक श्रीवास्तव यांना निवेदन देण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज सादर केले होते. परंतु मागील महिन्यात व्यवस्थापक रजेवर गेले होते. त्यामुळे १५ ते २० कि.मी. अंतरावरील शेतकऱ्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागल्या. कर्जापासून वंचित शेतकरी हवालदिल झाला आहे. ही समस्या त्वरित सोडवून पीक कर्ज वाटप करावे, कर्मचारी वेळेवर न येणे, लिंक फेलची नेहमीची समस्या सोडवावी व जनतेचा त्रास कमी करावा या मागणीसाठी बसपातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना यात अध्यक्ष संजय बोहरे, प्रदेश सचिव डी.एस. मेश्राम, येटरे, पत्रकार प्रा. सागर काटेखाये, पत्रकार राजू फुंडे, विलास फुंडे, माधोराव कोरे उपस्थित होते.