देवरी : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाईन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
बोंडगावदेवी : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
सडक-अर्जुनी : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार?
अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवस-रात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र, रानडुकरे शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
पांढरी येथे मोबाईल सेवा विस्कळीत
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे जिओ, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल आदी माेबाइल कंपनीचे टॉवर आहेत; परंतु मागील ८-१० दिवसांपासून कोणत्याच कंपनीचे नेटवर्क काम करीत नसल्याने, ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी अडचण जात आहे. त्यामुळे नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
मुंडीकोटा येथील बँकेत असुविधा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँकेला परिसरातील १५ गावे जोडलेली आहेत. या बँकेत चढ-उतार करताना वृद्ध नागरिकांना त्रास होतो. ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने अडचण होत आहे. या बँकेचे एटीएमसुद्धा अनेकदा बंद असते. त्यामुळेही ग्राहकांची गैरसोय हाेत आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
बनगाव येथे
घाणच घाण
आमगाव : शहरातील बनगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा रोड परिसरात कचराकुंडी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया : जिल्ह्यातील गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरूवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशात हे हातपंप दुरूस्त करण्याची गरज असून तशी मागणी केली जात आहे.
लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ
केशोरी : येथे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने तालुका प्रशासनाने लॉकडाऊन घोषित करून आवागमन करण्यासाठी संचारबंदीवर आळा घातला आहे. येथील बाजारपेठ बंद असल्यामुळे काही फळ विक्रेते घरच्या घरून फळे अधिकची किंमत आकारून विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन वाजवीपेक्षा अधिक पैसे घेऊन फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या महामारीत चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे फलाहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा फायदा घेत फळ विक्री करणारे दुकानदार आंबे, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, चिकू, केळी, संत्री मूळ किमतीपेक्षा दुपटीने दर आकारून विक्री करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असली तरीही घरच्या घरून फळांची विक्री सुरू करून चुकीच्या पद्धतीने पैसे कमाविणाऱ्या दुकानदारावर पोलीस विभागाने कारवाई करून अंकुश लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एसटीतील राखीव जागांचा वापर नाही
बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र, या बसेसमधील आरक्षित जागांचा कधीच वापर होत नसल्याचे दिसून येते. एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार अशाप्रकारे राखीव सीट असतात; परंतु यांचा वापर होत नाही.