गोरेगाव : शहरात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यातच सोमवारी (दि. १२) शहरातील दोन तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र नगर पंचायतचे कर्मचारी स्वतःच्या घरी नगर पंचायतचे अग्निशमन वाहन नेत घर सॅनिटाईज करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तर जिथे कोरोना वाढत आहे तसेच जिथे कोरोनामुळे मृत्यू झाला तेथे मात्र सॅनिटाईज करण्याचे सौजन्य दाखवित नाही. अशात आपल्या घरी वाहन नेऊन घर सॅनिटाईज करण्यासाठी कर्मचाऱ्याला वाहन कसे देण्यात आले, असा सवाल माजी बांधकाम समिती सभापती रेवेंद्र बिसेन यांनी उपस्थित केला आहे.
नगर पंचायतने गेल्या ८-१० महिन्यांपासून शहरात सॅनिटायजेशन केलेले नाही. सध्या कोरोनामुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नगर पंचायतचे कायम दुर्लक्ष नागरिकांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात जिथे-जिथे कोरोना रुग्ण निघाले किंवा जिथे कोरोनामुळे मृत्यू झाला तेथे सॅनिटाइजेशन न करता सध्या नगर पंचायत मर्जीतल्या कर्मचाऱ्यांच्या घरी सॅनिटायजेशन करीत असल्याचा आरोप बिसेन यांनी केला आहे.
गेल्या ४-५ महिन्यांपासून नगर पंचायतवर प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुणाचे भय नसून सर्वत्र मर्जीतला खेळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यापासून तर अनेक गंभीर प्रश्न शहरवासीयांपुढे आवासून उभ्या आहेत. मात्र नगर पंचायत प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही बिसेन यांनी केला आहे.
नगर पंचायतने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे या क्षेत्राचे आमदार विजय रहागडाले लक्ष देतील काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.