रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
सडक-अर्जुनी : वन संपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे होत असलेले दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही. नागरिक या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भर घालण्यात आली असली तरी हे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातीच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. याकरिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने वन्यजीवांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी केली.
दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब सहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.
तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.
नाल्यांवरचे अतिक्रमण काढा
गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत.
महावितरणने विविध आकार व कर कमी करावे
नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीजग्राहकांची आर्थिक लूट महावितरणने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.