शिक्षण विभाग : तीन महिन्यांपासून बिनपगारीअर्जुनी/मोरगाव : अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाले नसल्याने सदर कर्मचाऱ्यांनी १९ आॅगस्टपासून पं.स.कार्यालयासमोर लेखनीबंद आंदोलन सुरू केले आहे.तालुक्यातील शिक्षण विभागाचा संपूर्ण डोलारा सांभाळणाऱ्या अर्जुनी/मोरगाव येथील शिक्षण विभागातील ७ कर्मचाऱ्यांचे माहे मे, जून, जुलै या तीन महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत सदर कर्मचाऱ्यांनी ७ आॅगस्ट रोजी संबंधितांना निवेदन देवून १५ आॅगस्टपर्यंत पगार देण्यात यावे अन्यथा लेखनीबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला होता. परंतु संबंधितांनी आजतागायत या प्रकरणी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचारी पगारापासून वंचित आहेत. या आंदोलनात टी.बी. भांडारकर, एस.के. तिवारी, एच.वाय. बम्बार्डे, एस.एम. समरीत, पि.ए. डोंगरवार, पी.जी. फुलझेले, आर.के. शहारे आदी कर्मचारी सहभागी आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पगारासाठी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू
By admin | Published: August 19, 2014 11:47 PM