विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असलेला तालुक्यातील हाजराफॉल पर्यटकांना वर्षभर भुरळ घालणारा आहे. हे पर्यटन केंद्र परिसरातील ५० युवक-युवतींना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देते. परंतु कोरोनामुळे मागील १ महिन्यापासून हाजराफॉल पर्यटन स्थळ बंद केल्याने त्या युवक-युवतींचा रोजगार थांबला आहे.हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून येथील युवक-युवती सेवा देतात. तसेच पर्यटन केंद्राचे व्यवस्थीत संचालन करीत आहेत.या सेवेसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नवाटोला) यांच्यामार्फत गाव व परिसरातील युवा उत्साही व कर्तव्यनिष्ठ मुला-मुलींना काम दिले जात असून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. हाजराफॉल परिसरातील गावे आदिवासीबहुल व मागासलेले असून या क्षेत्रात रोजगाराचे कोणतेच साधन नाहीत. अशात हाजराफॉलमुळे नवाटोला व कोसमतर्रासह या परिसरातील ४-५ गावांतील युवक-युवतींना रोजगार मिळाला.सन २०१४ मध्ये काही मोजक्या ५-७ युवकांनी या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून सेवा कार्याला सुरूवात केली होती. आज या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून २६ मुली आणि २४ मुलांना रोजगार देण्यात आला आहे.मागील काही वर्षात काही युवक-युवतींनी संसार थाटून आपली सेवा सुरू ठेवली. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हाजराफॉल बंद केल्यामुळे त्यांचा रोजगार थांबला आणि आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली आहे.२४ मार्च रोजी देशात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले. परंतु कोविड-१९ व्हायरसचा देशात संसर्ग वाढताना पाहून पर्यटन विभागाने आधीच खबरदारी घेतली. त्यानुसार स्थानिक वन विभागाने ‘लॉकडाऊन’च्या ८ दिवसांपूर्वीच हाजराफॉल बंद केले.त्यामुळे येथे काम करणारे सर्व ५० युवक-युवती आपापल्या घरी बेरोजगार होऊन बसलेत. अशात त्यांना आपले कुटुंब चालविणे कठीण होऊ लागले आहे.हाजराफॉल केव्हा सुरू होणार?देशात कोरोना संसर्गाचा धोका झपाट्याने वाढत चालला असून हजारो लोक संक्रमित झाले आहेत. हा प्रादुर्भाव केव्हा थांबेल हे सांगणे सध्यातरी खुपच कठीण आहे. पर्यटन क्षेत्रात येणारे बहुतांश पर्यटक शहरातून येतात. अशात पुढील कित्येक महिने कोरोनाचा संसर्ग राहण्याची भीती कायम राहणार आहे. त्यामुळे पुढे पावसाळा सुरू झाला तरी हाजराफॉल खुले करणे शक्य नाही. याचा थेट फटका येथील काम करणाऱ्यांना बसणार आहे.शासनाकडून मदत मिळावीहाजराफॉल बंद झाल्यामुळे येथे काम करणाऱ्या युवक-युवतींच्या हाताला मिळणारे काम बंद झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अशात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मार्फत शासनाने त्या युवक-युवतींना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक मदत करण्याची मागणी आहे.
कोवीड-१९ या संसर्गाच्या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळविल्याशिवाय पर्यटन स्थळ सुरू होणार नाही. अशात संबंधित विभागाचे आदेश मिळेपर्यंत हाजराफॉल सुद्धा बंद ठेवण्यात येईल.-अभिजीत ईलमकरवन परिक्षेत्राधिकारी, सालेकसा