गोंदिया : शनिवारपासून तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. १८ वर्षांवरील प्रत्येेक युवकांनी लसीकरण करून आपल्या आजूबाजूच्या लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहन करावे, असे अभाविप नगरमंत्री व प्रांत कार्यकारणी सदस्य अतुल कावळे यांनी कळविले आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी नियमित मास्कचा वापर, गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर महत्त्वाचे आहे. आता कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढणारे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाच्या ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले, तर आता तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील युवकांना लसीकरण करण्यात येणार आहे. असे असले, तरी लसीकरणाबाबत काही गैरसमज पसरविले जात असल्याने, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५० टक्केच लसीकरण झाले आहे. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संभ्रम व भीती दूर करून ते लसीकरणासाठी प्रवृत्त व्हावेत, यासाठी युवकांनी स्वतः लसीकरण करून इतरांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या दिशेने पाऊल उचलले असून, आजवर अनेकांना ऑक्सिजन, खाटा, रक्त, प्लाझ्मा उपलब्ध करून दिले असून, आता लसीकरणासंदर्भात नऊशे गावात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन युवकांनी लसीकरण करावे, असे आवाहन कावळे यांनी कळविले आहे.