आमगाव : शहरातील मुख्य मार्गावरील रस्ते व नाली बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु या नाल्यांवर अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. याकडे लक्ष देत प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शहरातील मुख्यमार्ग व नाली बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, यात नाली बांधकामाना प्रारंभ करण्यात आला आहे. यात व्यावसायिकांनी नालीवर अतिक्रमण करून दुकान थाटून मार्ग अडविला होता.
या व्यावसायिकांना नालीवरील अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभागाने नोटीस बजावली होती. परंतु व्यावसायिकांनी अतिक्रमण काढले नव्हते. यामुळे बांधकाम विभागाने नालीवरील अतिक्रमण काढण्यासाठी कार्यवाही केली. यात अनेक इमारतींचे अतिक्रमण काढण्यात आले होते.
शहरातील रेल्वे स्टेशन ते लांजी रोड मार्गावर रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम एका बाजूने सुरू आहे. या नालीवरचे अतिक्रमण काढले असताना पुन्हा व्यावसायिकांनी अतिक्रमणे केले आहे. यामुळे पूर्वीच रस्त्यावरून मार्गक्रम करताना नागरिकांची दमछाक होती ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रशासनाने नालीवर अतिक्रमण करणााऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
--------------------------
लहान व्यावसायिकांचा बळी
मुख्य मार्गाच्या कडेला नाली बांधकाम सुरू असून, यात लहान व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले. पण मोठ्या व्यावसायिकांना संरक्षण देण्यात येत असल्याचे फुटकर व्यावसायी सांगत आहेत. मोठ्या व्यावसायिकांच्या इमारती अतिक्रमणात असून, त्यांची इमारत पाडण्यात येत नाही, अशी खंतही फुटकर व्यावसायिकांनी व्यक्त केली.