अतिक्रमण हटाओ मोहीम : मार्गावरील अनेक पानटपऱ्या व शेड हटविलेलोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : सडक-अर्जुनी, गोरेगाव व गोंदिया या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ असा दर्जा देण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार आहे. मात्र या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला त्रास होऊन येथे अपघात घडत होते. यावर शहरात अतिक्रमण मोहीम राबवून गुरूवारी (दि.२२) शहरातील या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. कोहमारा ते सडक-अर्जुनी या दोन किलोमीटरच्या मार्गावर व्यवसायीकांनी आपले व्यवसाय थाटून घेतले. दुकानाचे बोर्ड व सामान लोकांना दिसावे यासाठी व्यवसायीकांकडून रस्त्यावर ठेवले जात होते. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच आपली वाहने ठेवावी लागत होती. परिणामी नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. स्टेट बँकेसमोर पार्कींगची सुविधा नसल्यामुळे तेथेही लोकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करून जावे लागत होते. यामुळे या मार्गावर दर आठ दिवसांनी एक-दोन अपघात नेहमीत घडत होते. अतिक्रमणामुळे विकासकामांना अडथळा होत होता. याची दखल घेत नगरपंचायतने अतिक्रमण धारकांना अनेकवेळा नोटीस दिले. मात्र नगर पंचायतच्या पोकळ धमक्यांना अतिक्रमणधारकांनी कधीच दाद दिली नाही. अशात राष्ट्रीय महामार्ग उप विभागाकडून उपविभागीय अभियंता यांनी तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून अतिक्रमण काढण्यात सहकार्य करण्याचे कळविले. त्या अनुषंगाने संबंधीत अतिक्रमण धारकाना ८ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावून २२ जून रोजी अतिक्रमण काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. ठरल्यानुसार गुरूवारी (दि.२२) अतिक्रमण काढण्यास सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या मधून ४० फूट असे अंतर मोजून दोन जेसीबी लावून पोलीसाच्या ताफ्यात अतिक्रमण हटविण्यास सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली. या अतिक्रमणात अनेक पानटपऱ्या, दुकानांचे शेड स्वत: काढायला लोकांनी सुरूवात केली. अतिक्रमण हटाओ मोहीम राबविताना राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता लभाने, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, ठाणेदार केशव बाभळे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अखीलभारत मेश्राम, खोकले, नगर पंचायतचे अधिकारी संदीप रूद्रवार यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढले
By admin | Published: June 23, 2017 1:11 AM