लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासन आणि प्रशासनातर्फे युध्दपातळीवर उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दररोज बैठका घेत आहेत. मात्र गोंदिया शहरवासीयांच्या आरोग्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. शहरात सर्वत्र केरकचऱ्याचे ढिगारे पडले असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण, याकडे नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन बैठकांमध्ये व्यस्त तर शहरवासीय केरकचऱ्याने त्रस्त असल्याचे चित्र शहरात सध्या कायम आहे.अस्वच्छता हीच सर्व आजारांचे मूळ आहे. त्यातच सध्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही नगर परिषद केवळ बघ्याची भूमिका निभावित आहे. शहरात प्रवेश केल्यापासूनच केरकचऱ्याचे ढिेगारे पडलेले दिसतात. या कचऱ्यावर डुकरांचा स्वच्छंदपणे वावर सुरू असतो. तर कचरा संकलन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कचरापेट्यांमधील कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने त्या तुडूंब भरुन सर्वत्र कचरा पसरला आहे. विशेष म्हणजे गोरेलाल चौक, प्रभू रोड, पोस्ट आॅफिस रोड या मार्गावर काही ठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच याच लगत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहे. हाच कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये पडून असल्याने शहरवासीयांना दूषीत पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. नेहरु चौकातील पुतळ्यासमोर केचकचºयाचे ढिगारे मागील दोन तीन दिवसांपासून पडले आहेत. थोर पुरुषांपासून नागरिकांना प्रेरणा मिळावी यासाठी थोरपुरुषांचे शहरात ठिकठिकाणी पुतळे उभारण्यात आले आहे. मात्र या पुतळ्यांच्या परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून या थोर पुरुषांना सुध्दा स्वत:चा अपमान होत असल्याची जाणीव होत असावी असेच चित्र आहे. शहरातील कुठल्या भागात जा त्या ठिकाणी केरकचºयाचे ढिगारे पडले नसतील तर आश्चर्य वाटेल. संपूर्ण शहरालाच केरकचऱ्याचा वेढा असल्याचे चित्र आहे. शहरवासीयांची याबद्दल ओरड सुरू आहे. मात्र ही अद्यापही नगर परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना नगर परिषदे स्वच्छतेप्रती ऐवढी उदासीन राहली नसती. शहराचे बकाल हाल होत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे सुध्दा याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.मागील आठवडाभरापासून त्या केवळ कोरोनाच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.शहरात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास जवाबदार कोणशहरात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांलगतच केरकचऱ्याचे ढिगारे पडले आहे. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून नागरिकांना दूषीत पाण्याचा पुरवठा होऊन साथ रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अद्यापही ही बाब नगर परिषदेने गांर्भियाने घेतलेली नाही.त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याची नगर परिषदेला किती काळजी आहे दिसून येते.डासनाशक फवारणीचा विसरकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर परिषदेने शहरात प्रतिबंधकात्मक उपाय योजना राबविणे अपेक्षित होते. तसेच केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावून डासनाशक फवारणी करण्याची गरज होती. तसेच पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे शिवाय इतर उपाय योजना करणे अपेक्षित होते. मात्र यासंदर्भात कुठलेही पाऊल नगर परिषदेने अद्यापही उचललेले नाही.कचऱ्याची रोज विल्हेवाट तर रस्त्यावर कचरा कसा?शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने ३३ आॅटो टिप्पर, घंटा गाड्यांची खरेदी केली आहे. त्यांच्या माध्यमातून दररोज केरकचरा संकलीत केला जात असल्याचा दावा नगर परिषदेचे अधिकारी करीत आहे. मग कचरपेट्या आणि रस्त्याच्या लगत केरकचºयाचे ढिगारे कसे पडून आहेत. असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.अधिकार आहेत तर वापर केव्हा करणार ?नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खर्रा खावून रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही दिवस पानठेले बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. आपत्तकालीन स्थिती अश्या उपाय योजना करण्याची तरतूद सुध्दा आहे. मग नगर परिषद कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा करित आहे हे कळण्यास मार्ग नाही.जनजागृतीत सुध्दा उदासीनताकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व याला प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाय योजना कराव्यात यासाठी शासन आणि प्रशासनाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. मात्र नगर परिषदेने अद्यापही यासाठी कुठलीच पाऊले उचली नसल्याचे चित्र आहे.आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर घेणार का दखलशहरातील अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यामुळे शहरवासीयांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे साथरोगांची लागण झाल्यानंतर नगर परिषद कामाला लागणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.कराची आकारणी करता मग सुविधा का नाही?नगर परिषदेकडून शहरवासीयांकडून विविध कराची आकारणी केली जाते. तो कर शहरवासीय सुध्दा नियमित भरतात. मात्र शहरवासीय ज्या गोष्टींचे कर नगर परिषदेकडे भरतात मग त्यांना त्या सुविधा देणे हे नगर परिषदेचे काम आहे. मात्र गोंदिया शहराची सध्या स्थिती पाहता हे केवळ नाममात्र ठरतात. त्यामुळे कराची आकारणी करता मग सुविधा का देत नाही असा सवालही शहरवासीय करीत आहे.
प्रशासन बैठकीत व्यस्त अन् शहरवासीय कचऱ्याने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 6:00 AM
अस्वच्छता हीच सर्व आजारांचे मूळ आहे. त्यातच सध्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही नगर परिषद केवळ बघ्याची भूमिका निभावित आहे. शहरात प्रवेश केल्यापासूनच केरकचऱ्याचे ढिेगारे पडलेले दिसतात.
ठळक मुद्देठिकठिकाणी केरकचऱ्याचे ढिगारे : न.प.ची बघ्याची भूमिका,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना नाहीच