डीवायएसपी मंदार जवळे : राज्यस्तरीय रासेयो शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन बोंडगावदेवी : महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ जीवन घडविणारा काळ असतो. रासेयोच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. जिज्ञासा ध्येय निश्चित करण्याची क्षमता निर्माण होते. शिस्तप्रिय जीवन जगण्याची संधी मिळते यातून व्यक्ती निर्भिड होतो, असे उद्गार देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या ५ व्या दिवशी बौध्दीक सत्रात ते शिबिरार्थ्याना मार्गदर्शन करीत होते. सार्वजनिक समाज मंदिरात रासेयो शिबिराच्या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी एस. एस. जे. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डा.पी.एस.डांगे होते. यावेळी सरपंच राधेश्याम झोळे उपस्थित होते. मंदार जवळे पुढे म्हणाले, रासेयोच्या शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याना आयुष्य घडविण्याची जिज्ञासा निर्माण होते. यशाचे शिखर गाठण्याची क्षमता निर्माण होते. आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, जीवनात उद्दिष्ट धाडस येण्यासाठी तसेच इतरांशी संबध प्रस्थापित करून सामाजिक बांधीलकी जपावी. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या गुणांना वाट मोकळी करुन शिस्तीने व जबाबदार नागरिक घडण्याची संधी रासेयो शिबिराच्या माध्यमातून मिळवता येते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यानी आपल्यापुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जावून आपल्याला पुढील यशस्वी आयुष्य घडवायचे आहे याचा निर्धार करणे आवश्यक आहे. उज्वल ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. इतरांशी तुलना न करता, स्वत:चा जीवन सार्थक करण्यासाठी सतत धडपडण्याचा मार्ग अवलंबवावा. कठीण प्रसंगाला घाबरून न जाता धैर्याने, चिकाटीने आलेल्या समस्यावर मात करून जो यश मिळतो त्याचा आनंद हा अविस्मरणीय राहून चिरकाल टिकणारा असतो. अवांतर वाचन, वर्तमानपत्र चाळणे, अनेक विचारवंताचे आत्मचरित्र वाचन हे स्पर्धा परिक्षांचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यानी भ्रमणध्वनीचा वापर सवयी म्हणून करू नये. जन्मदात्या मायबापाच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यानी ईतर वाईट सवयींना तिलांजली देऊन आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश पदरी पडेल. सोसल मिडीयावरील पोस्टमुळे इतरांच्या भावना दु:खावणार नाही, असे कृत्य झाल्यास सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविला जातो असे सांगीतले. याप्रसंगी शिबिरार्थ्यानी केलेल्या प्रश्नांचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले. आभार शिबिराचे संयोजक प्रा.डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)
रासेयोेतून वाढतो आत्मविश्वास
By admin | Published: January 15, 2017 12:18 AM