गोंदिया : राज्य शासनाने ३० वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिल्याने युवा वर्गात लसीकरणाला घेऊन चांगलाच जोश दिसून येत आहे. त्यामुळेच आतापर्यंत २७१३८ युवांनी लस घेतली आहे. विशेष म्हणजे, अन्य गटांच्या तुलनेत ३०-४४ गटात लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे.
केंद्र सरकारने २१ जूनपासून देशात १८ वर्षांपुढे प्रत्येकाला लसीकरणास परवानगी दिली होती. मात्र, राज्य शासनाने १८ ऐवजी ३० वर्षांवरील लसीकरणाला परवानगी दिली व त्यानुसार राज्यात ३० वर्षांवरील पुढे वयोगटांतील लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात लसीकरणाला आता चांगली गती येताना दिसत आहे. यामुळेच आतापर्यंत ३६७६३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाला घेऊन तरुण व युवावर्गात चांगलाच उत्साह दिसून येत होता. त्यानुसार, आता ३०-४४ गटात लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढत असताना दिसत असून आतापर्यंत २७१३८ युवांनी लस घेतली आहे. त्यात २१२५७ युवांनी पहिला डोस तर ५८८१ युवांनी दुसरा डोस घेतला आहे.
---------------------------------
सर्वाधिक लसीकरण ४५-६० गटात
जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रशासनाकडून केंद्र वाढविण्यात आले असून यासह जनजागृती केली जात आहे. त्याचे चांगले परिणामही दिसत असून आतापर्यंत ३६७६३७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात १८-४४ वयोगटातील २७१३८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे तर सर्वाधिक लसीकरण १७६९६६ नागरिकांचे झाले असून दुसऱ्या क्रमांकावर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असून ११०४४८ नागरिकांनी लस घेतली आहे.