गोंदिया : येथील गोंदिया शिक्षण संस्था संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरणाला कसे वाचवायचे, या विषयावर विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते. चर्चासत्राला प्राचार्य डाॅ. शारदा महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाइन विद्यार्थी संवादात एम.ए. राज्यशास्त्राचे विद्यार्थी अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उईके व तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी, खनिज पर्यावरणाच्या या घटकांचा प्रमुख समावेश असलेल्या पर्यावरणाला कसे वाचवायचे व त्या माध्यमातून नागरिकांना निरोगी आयुष्य मिळेल, यावर विचारमंथन करण्यात आले, तर प्रत्येकाने पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखून आठवड्यातून एक दिवस पर्यावरणाच्या कामासाठी वेळ द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन विश्वनाथ उके यांनी केले. आभार नेहा यादव यांनी मानले.
.......
पर्यावरणाच्या समस्या आणि त्यांचे निराकरण
इतिहास विभागाच्या वतीने ‘पर्यावरणाच्या समस्या आणि त्यांचे निराकरण’ या विषयावर डाॅ. कोंढा-कोसरे येथील महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक अरुण मोटघरे, अरुण अलेवार यांचे व पर्यावरण वाचविणे काळाजी गरज या विषयावर एमबी पटेल महाविद्यालय सालेकसा येथील प्रा. आश्विन खांडेकर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणा समस्येवर साधक-बाधक चर्चा करून पर्यावरण वाचविणे कशी काळाची गरज आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. योगेश भोयर व डाॅ. अंबादास बाकरे यांनी सहकार्य केले.
------------------------
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन
पर्यावरणाची माहिती व्हावी व पर्यावरण विषयाची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याच्या दृष्टीने भूगोल विभागाच्या वतीने पर्यावरण विषयावर ५० प्रश्नांची प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेेतील दोन विजेत्या विध्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी भूगोल विभागाचे डाॅ. संतोष चोपकर व डाॅ. माया आंभोरे यांनी सहकार्य केले.