गोंदिया : राज्यात कोरोनाचे उद्रेक होत असला तरीही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून नवीन बाधितांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच येत आहे. त्यात शनिवारी (दि.२०) जिल्ह्यात ५ नवीन बाधितांची भर पडली असून ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, शनिवारी आकडेवारी ‘इक्वल-इक्वल’ दिसून आली. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १४३१९ झाली असून यातील १४०७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ५६ रुग्ण क्रियाशील आहेत.
राज्यात आता कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे बघून सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. राज्य शासनानेही उपाययोजनांवर भर दिला आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून ही चांगली बाब असली तरी जिल्हावासीयांनी अतिरेक न करता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. शनिवारी जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी बघितली असता त्यात ५ नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये हे ५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यातील ४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील तर १ रुग्ण आमगाव तालुक्यातील आहे. आता जिल्ह्यात ५६ रुग्ण क्रियाशील असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४६, गोरेगाव २, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रूग्ण आहे.
विशेष म्हणजे, राज्यात वाढता उद्रेक बघता आता राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यासाठी आदेश काढले आहेत. अशात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आजघडीला जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याचे बघून नागरिकांकडून उपाययोजनांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे. कित्येक नागरिक मास्क न लावता फिरताना दिसत आहे. शारीरिक अंतराचे पालन केले जात नसून हा प्रकार धोकादायक आहे. अशात कोरोना विषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
---------------------------
३३ रुग्ण घरीच अलगीकरणात जिल्ह्यात आता ५६ रूग्ण क्रियाशील असून यातील ३३ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तालुकानिहाय बघितल्यास, गोंदिया तालुक्यात २९, गोरेगाव १, सालेकसा १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.२ टक्के असून मृत्यूदर १.२० टक्के आहेत. तर व्दिगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.
---------------------------
आतापर्यंत १३६३८० चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १३६३८० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६८८१० आरटी-पीसीआर चाचण्या असून ८४५३ पॉझिटिव्ह तर ५७११८ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रकारे, ६७५७० रॅपीड ॲंटिजन चाचण्या असून यातील ६१६० पॉझिटिव्ह तर ६१४१० चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.