लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्याप्रमाणे पाण्यावर प्रत्येक प्राण्याचा समान हक्क आहे, त्याचप्रकारे गरीब असो किंवा श्रीमंत, शहरी असो किंवा ग्रामीण, आरोग्य सेवेवरसुद्धा प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. क्षेत्राच्या प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.पांढराबोडी येथे रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, गोंदियात लवकरच शासकीय मेडीकल कॉलेजच्या माध्यमाने ५०० खाटांचा मोठा रूग्णालय निर्मित होत आहे. त्यात जगातील सर्वच अत्याधुनिक तपासणी मशीन्सच्या माध्यमातून उपचार होईल. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला उपचारासाठी नागपूर किंवा मुंबईला जावे लागणार नाही. प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचेल तरच नागरिक स्वस्थ राहू शकतील व देशाची प्रगती होवू शकेल. आरोग्य सेवा हिच खरी मानवसेवा आहे. त्यासाठी मागील वर्षांत राज्याच्या काँग्रेस सरकारच्या नेतृत्वात गोंदिया तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न केले व सर्वांच्या सहकार्याने यशस्वीसुद्धा झालो. रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालय व खमारी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा दर्जा वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. आता खमारीच्या आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यातच गोंदिया तालुक्यातील कासा, तेढवा, कुडवा, सिरपूर, सावरी, महालगाव, मरारटोला, लहीटोला, कटंगटोला आदी गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची स्थापना करून प्रत्येक गावापर्यंत शासकीय आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.या वेळी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी शासनाकडून दोन कोटी ७० लाख रूपयांची आर्थिक मदत मंजूर करवून घेतली व त्यांनी केलेल्या विकासकार्यावर प्रकाश टाकला. तसेच उपसरपंच धुरण सुलाखे यांनी जिल्ह्यातील डिजिटल शाळांवर माहिती दिली. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.सदर आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून संबंधित डॉक्टरांकडून आपापल्या आजारांबाबत तपासणी करून घेतली. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, माजी जि.प. सदस्य रमेश लिल्हारे, माजी पं.स. सदस्य बंडू शेंडे आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवेवर सर्वांचा समान हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 9:47 PM
ज्याप्रमाणे पाण्यावर प्रत्येक प्राण्याचा समान हक्क आहे, त्याचप्रकारे गरीब असो किंवा श्रीमंत, शहरी असो किंवा ग्रामीण, आरोग्य सेवेवरसुद्धा प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पांढराबोडी येथे रोग निदान शिबिर