गोंदिया : आपल्या गचाळ कामाची जाणीव लोकांना होऊ नये म्हणून तालुका व प्रभागस्तरीय शाळांच्या मूल्यांकन समितीतून बातमीदारांना बाद केले. परिणामी सुसूत्रता आणण्याऐवजी गावची शाळा आमची शाळेला घरघर लावण्याचे काम अधिकारी व पदाधिकारी करीत आहेत. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी दोन वर्षापूर्वी गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम माजी शिक्षण सभापती विनोद अग्रवाल यांनी अंमलात आणला. परंतु अवघ्या दोन वर्षातच या उपक्रमाचे धिंडवडे निघाले. गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम सुरू करताच जिल्हा परिषदेची स्तुती जिल्ह्याबरोबर राज्यात झाली. परंतु घेतलेला निर्णय पुढे चालू ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अपयशी ठरली. पहिल्या वर्षी पुरस्काराच्या रकमेची संख्या मोठी होती. परंतु दुसऱ्या वर्षी अर्ध्या रकमेने कमी करण्यात आले. या मोहीमेत सुसूत्रता राहावी यासाठी शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग, तालुका व जिल्हा समितीत बातमीदारांचा समावेश करण्याचे ठरविले. परंतु यावर्षी झालेल्या मूल्यमापनातून बातमीदारांना डावलून मूल्यमापन करण्यात आले. मागच्या वर्षीच्या मूल्यमापनात बातमीदारांनी शाळांतील मूलभूत सोयी, समस्या यांना चांगलीच वाचा फोडल्यामुळे यावर्षी बातमीदारांना मूल्यमापन समित्यांमध्ये घेण्यात आले नाही. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी बातमीदारांना सोबत घ्यायचे नाही असा अलिखित फतवा काढला होता. त्यामुळे गावची शाळा आमची शाळा या उपक्रमाच्या मूल्यमापनात बातमीदारांना घेतले नाही, अशी ओरड आहे. गावची शाळा आमची शाळा या उपक्रमासाठी शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीत पत्रकार सदस्य असावा असा नियम हा उपक्रम सुरू करताना जिल्हा परिषदेने घेतला. दुसऱ्याच वर्षी या नियमाला तिलांजली देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूलभूत सोयी, भौतिक सुविधा व गुणवत्तेत वाढ व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. परंतु पहिल्या वर्षीच या उपक्रमाला जोशपूर्ण राबविण्यात आले. दुसऱ्या वर्षीपासून या मोहिमेकडे जिल्हा परिषदच्या बड्या अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. या उपक्रमाचे धिंडवडे उडविण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
त्रुट्या समोर येऊ नये म्हणून सदस्यांना डावलले
By admin | Published: June 29, 2014 11:58 PM