नवेगावबांध : नवेगावबांध हे राष्ट्रीय उद्यान व न्यू नवेगाव-नागझिरा अभयारण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील वनात अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती आढळून येतात. यासाठी येथील जंगल, पशुपक्षी व वनस्पती जागतिक ख्यातीप्राप्त पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्यासाठी ही जंगले कायमच अभ्यासाचे केंद्र राहिले आहेत. पशुपक्ष्यांच्या येथील सुरक्षित अधिवासामुळे हे पर्यटन केंद्र जागतिक ख्यात प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलात वनाधिकाऱ्यासाठी निवासस्थाने बांधलेली आहेत. परंतु ही निवासस्थाने वापरात नसल्यामुळे नुसतेच रिकामे पडून आहेत. त्यामुळे तेथे सुसज्ज वाचनालयाची निर्मिती करावी. अशी मागणी येथील स्थानिक व परिसरातील युवकांनी केली आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकून राहण्यासाठी व दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्थानिक व परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षा देणे व त्याची तयारी करण्यासाठी एका समृद्ध वाचनालयाची गरज आहे. नवेगावबांध सारख्या ग्रामीण व आदिवासी परिसरात युवकांना ही गरज पूर्ण करण्यासाठी सुसज्ज व परिपूर्ण अशा ग्रंथालयाची गरज भासत आहे. स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष द्यावे व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली राहत असलेल्या ‘मनोली’ या निवासस्थानी एक सुसज्ज वाचनालय निर्माण व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक व परिसरातील युवकांनी व्यक्त केली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी व लोप पावत चाललेली वाचन संस्कृती समृद्ध ठेवण्यासाठी, बाहेरून येणाऱ्या पक्षी, प्राणी, वनस्पती, निसर्ग, जैवविविधता अभ्यासकांसाठी हे सुसज्ज असे वाचनालय निर्माण जर झाले तर आपले स्वतःचे भविष्य घडवू पाहणारे, स्थानिक युवक, विद्यार्थी व निसर्ग अभ्यासकांना राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलात निसर्गरम्य व शांत अनुकूल वातावरणात हे वाचनालय म्हणजे एक पर्वणीच ठरेल. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, पुढारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन उद्याचे भविष्य घडविणाऱ्या युवकांना ही संधी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
-----------------------------
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी तज्ज्ञ व थोर मराठी साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा सहवास लाभलेले ‘मनोली’ हे पर्यटन संकुलातील निवासस्थान सध्या रिकामेच पडले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी स्मृतिप्रीत्यर्थ तेथे सुसज्ज असे ग्रंथालय उभे राहावे यासाठी आपण प्रयत्न व पाठपुरावा करणार आहोत.
- अनिरुद्ध शहारे, सरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध.
-----------------------
कोट २
राष्ट्रीय उद्यानात येणारे वनाधिकारी शासकीय निवासस्थानी राहत नाही. काही अधिकारी विभागाच्या विश्रामगृहात राहतात. त्यामुळे हे निवासस्थान रिकामे पडले असून असेच मोडकळीस येतील. त्यामुळे ‘मनोली’ या राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुल परिसरातील मारुती चितमपल्ली यांच्या सहवास लाभलेले हे निवासस्थान त्यांच्या आठवणींचे स्मरण रहावे. यासाठी या ठिकाणी सुसज्ज अशा वाचनालयाची निर्मिती व्हावी.
-विजय डोये, अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन